जळगाव : २०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार – आमदार एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील आणि २०२४ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.

तीन पक्ष एकत्र राहणे अवघड आहे, असं चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांना मला सांगायचे आहे की, यापूर्वी देशात ३२ पक्ष हे एकत्र होते. देशभरातील ३२ पक्ष एकत्र करून अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. मग तीन पक्ष एकत्र न राहण्याचे कारण काय?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.

मी कार सेवक म्हणून अयोध्यामध्ये गेलो…
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसनेची बाबरी पाडण्यात कोणतीच भूमिका नव्हती असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले की, ‘आयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद तोडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. दोन वेळा मी कारसेवक म्हणून अयोध्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार ही मी खाल्लेला आहे. कोण यामध्ये होतं, कोणी नव्हतं हे मला माहित आहे. कारण मी दोन्ही वेळा गेलो, १५ दिवस मी तुरुंगामध्ये होतो. त्यामुळे मला माहित होतं की, कोणकोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते. यामुळे या विषयावर अधिक न बोललेलं बरं.’

हेही वाचा:

The post जळगाव : २०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार - आमदार एकनाथ खडसे appeared first on पुढारी.