नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट

नाशिक बस अपघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण अपघाताची माहिती पुढे येताच अवघ्या काही मिनिटांत पोलिस, अग्निशमन दल, अ‍ॅम्ब्युलन्स, सिटीलिंक बस, आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्ते सुरक्षा विभाग अर्थात रोड सेफ्टी डिपार्टमेंट अपघाताच्या तब्बल सात तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले. विशेष बाब म्हणजे अपघात नेमका कसा झाला? याची माहिती देणारा एकही प्रत्यक्षदर्शी त्यांना अपघातस्थळी आढळला नसल्याने यंत्रणेला ते नेमका कोणता अहवाल सादर करणार, याबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आडगाव, नांदूर नाक्यावर घडलेल्या या ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात तब्बल 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये संपूर्ण बस खाक झाली. अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला, याची अनेक कारणेही समोर आली. रस्त्यातील दोष आणि यंत्रणेचा हलगर्जीपणा ही दोन प्रमुख कारणे अपघाताला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांकडूनही यावरच बोट ठेवले जात असून, अपघात घडला त्या नाक्यावर जर गतिरोधक किंवा इतर महत्त्वाच्या उपाययोजना केलेल्या असत्या, तर कदाचित हा अपघात टाळता येऊ शकला असता. तसेच हा नाका म्हणजे अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अशात रोड सेफ्टी डिपार्टमेंटची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी वेळीच या त्रुटी लक्षात घेऊन उपाययोजना केल्या असत्या, तर 12 निष्पाप जीव वाचविता आले असते, असाही सूर यावेळी व्यक्त केला गेला. दरम्यान, इतका भीषण अपघात घडल्यानंतरही रोड सेफ्टी डिपार्टमेंट झोपेतच आहे की काय? याची प्रचिती अपघातानंतर आली. या विभागाचा एक अभियंता आपल्या स्टाफसोबत एका खासदाराचे पत्र घेऊन अपघातस्थळी तब्बल दीड वाजता पोहोचला. जणू काही सिक्रेट एजंट असल्याचा आव आणत त्याने घटनास्थळावर उपस्थित नागरिकांशी न बोलता थेट पोलिस अधिकार्‍यांना गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु सकाळपासून घटनास्थळी पहारा देत असलेल्या अधिकार्‍याने त्याला फारशी दाद दिली नाही. त्याची चलबिचल बघून काही नागरिकांनी त्याला अपघात नेमका कसा घडला, याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांशी बोलणे त्याने उचित समजले नाही. केवळ ‘अपघाताचा अहवाल आम्हाला संबंधित विभागाला सादर करायचा आहे.’ इतकेच तो सांगायचा. या सर्व पार्श्वभूमीवर, उशिरा येऊन कोणतीही माहिती जाणून न घेता हा अधिकारी नेमका काय अहवाल सादर करणार, असा प्रश्न मात्र उपस्थितांना पडला.

रस्त्यातील दोष दूर करणार :
रोड सेफ्टी डिपार्टमेंटच्या या अभियंत्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने या अपघाताबाबतचा अहवाल संबंधित विभागाला सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अहवालानंतर रस्त्यात जे काही दोष आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सांगितले. औरंगाबाद महामार्गावर हा अपघात घडल्याने रोड सेफ्टी डिपार्टमेंटने याची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक बोलून दाखवत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट appeared first on पुढारी.