जागतिक कॅमेरा दिन : डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खरा ‘आर्टिस्ट’ नामशेष

कॅमेरा दिन,www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ 

पूर्वीच्या काळी लग्नकार्य, वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज, घरभरणी अशा घरगुती कार्यक्रमांना आवर्जून फोटोग्राफर बोलविले जायचे. कॅमेऱ्याच्या एका रोलमध्ये ३६ फोटो काढले जायचे. त्यामुळे एक फोटो ‘परफेक्ट’ येण्यासाठी फोटोग्राफरचा खरा कस लागायचा. शिवाय एक फोटो क्लिक केल्यानंतर निगेटिव्ह, लॅब टेस्टसाठी किंमत मोजावी लागायची. त्यासाठी फोटोग्राफरला प्रॅक्टिस करावी लागायची. अभ्यास करून फोटो काढला जायचा. त्यानंतर फोटो लॅबमध्ये टेस्टिंगला दिल्यानंतर निगेटिव्ह कॉपीनंतर फोटो कसा आला ते समजायचे. तेव्हा फोटो बघण्याची उत्सुकता असायची आणि सुंदर आठवणी अल्बमच्या रूपात पुढील पिढीसाठी राखून ठेवल्या जायच्या.

आता तंत्रज्ञानात बदल झाला तसे २००३ पासून डिजिटल कॅमेरे बाजारात यायला सुरुवात झाली. रोल, लॅब टेस्ट, निगेटिव्ह पद्धत बंद झाली आणि फोटो बघण्याची उत्सुकता विरून गेली. डिजिटल कॅमेऱ्यामुळे कोणताही सराव न करता अनेक लोक या क्षेत्रात यायला लागले. क्लिक केल्यानंतर इन्स्टंट फोटो बघायला मिळतो म्हणून फोटोचा अँगल कळतो. रोलमध्ये ३६ फोटोंची मर्यादा असल्याने प्रत्येक फोटो परफेक्ट येण्यासाठी फोटोग्राफरचे कष्ट असायचे. आता एक अँगल ५० वेळा क्लिक केल्यानंतर त्यातील एक फोटो परफेक्ट निवडला जाताे. त्यामुळे फोटोग्राफरमधील आर्टिस्ट संपून गेला आहे. परिणामी, जे फोटोग्राफर काळानुसार बदलले नाहीत ते मागेच राहून गेले, पर्यायाने त्यांचा व्यवसाय डबघाईला आल्याचे चित्र आहे.

स्मार्ट फोनमुळे आता सगळेच फोटोग्राफर

घरगुती कार्यक्रमांचे फोटो आता मोबाइलमध्ये काढले जातात. त्यामुळे फोटोग्राफरला बोलावून कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्याची पद्धत आता बंद झाली आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्याने काढलेले फोटो लगेच स्टेटस, डीपी म्हणून ठेवले जातात. त्यामुळे पूर्वीसारखी फोटो बघण्याची उत्सुकता आता राहिली नाही. परंतु फोटो काढण्याची कला ही केवळ व्यावसायिक फोटोग्राफरकडे असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

तंत्रज्ञानाचा फायदा झाला पण..

डिजिटल कॅमेऱ्यांमुळे कामे सोपी झाली पण लोकांना इन्स्टंटची सवय लागली आहे. आज २५ वर्षांपूर्वीचा अल्बम बघितला तरी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. आता स्क्रीनवर इमेज बघायला मिळत असल्याने टच आणि फिल करण्याचा अनुभव राहिला नाही. फोटो बघण्याची उत्सुकता संपून क्षणिक आनंद घेण्याला महत्त्व आल्याचे दिसते.

गेल्या ३५ वर्षांपासून फोटोग्राफी क्षेत्रात काम करताेय. हल्ली लग्नकार्यात फोटो काढताना नातेवाईक मोबाइलमध्ये फाेटो, व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करतात. शिवाय लग्नाचा अल्बम, हार्ड कॉपीपेक्षा केवळ सॉफ्ट कॉपीची मागणी केली जाते. फोटो लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याने हार्ड कॉपी, अल्बम प्रकार कमी झाला आहे. फोटोची प्रिंट हातात आल्यानंतर फोटोचे महत्त्व वाढते.

– किरण तांबट, व्यावसायिक फोटोग्राफर

हेही वाचा :

The post जागतिक कॅमेरा दिन : डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खरा 'आर्टिस्ट' नामशेष appeared first on पुढारी.