जालना लाठीमारच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद

कडकडीत बंद,www.pudhari.news

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाज आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने व आस्थापना बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. आंदोलकांच्या वतीने येथील शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे आपले निवेदन सुपूर्द करण्यात आले.

आंदोलकांच्या वतीने शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व इतर मागण्यां साठी सनदशीर मार्गाने उपोषण सुरू होते मात्र 1 सप्टेंबर रोजी सदर उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अत्यंत अमान्यपणे लाठीमार केला. या हल्ल्यात उपोषण स्थळी सहभागी असलेले मराठा समाज बांधव, महिला लहान मुले व अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत. सदर घटना ही जालियनवाला बाग हत्याकांडाच्या समरूप असून लोकशाहीला लाजिरवाणी आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी व निंदनीय असून त्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिवार निषेध केला जात आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस बळाचा वापर करून उपोषण मोडीत काढण्याचा निर्दयी प्रकार केल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच अंतरवाली येथील दुर्दैवी घटनेची भविष्यात प्रतिक्रिया निर्माण होऊ नये म्हणून कोणालाही पाठीशी न घालता या अमानुष मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस दलातील प्रवृत्ती शोधून त्यांना तात्काळ निलंबित करावे व सदर घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी त्याचप्रमाणे मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मिळणे करता गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्वोच्च न्यायालयात योग्य ती भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा राज्य शासनाकडून या निवेदनातील मागण्यांचे वेळीच दखल न घेतली गेल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिवार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे.

या निवेदनात सर्वश्री बापूसाहेब कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, प्रमोद गाजरे, विजय धारराव, दिलीप कापसे, अजित धारराव, साहेबराव कापसे, चेतन कुंदे, गोकुळ जाधव, गणेश कापसे, चंद्रभान जाधव, आकाश गोळे, विशाल कापसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

The post जालना लाठीमारच्या निषेधार्थ निफाड येथे कडकडीत बंद appeared first on पुढारी.