ज्वारी खातेय भाव ; किरकोळ बाजारात ६० रुपये किलो दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ज्वारीचे भाव दुप्पटीने वाढले असून, गहू, बाजरीपेक्षाही ज्वारी भाव खात आहे. किरकोळ बाजारात ज्वारी ६० रुपये किलोने विकली जात आहे. यंदा पावसाळा कमी झाल्याने, त्याचा परिणाम ज्वारीच्या पिकावर झाला आहे. परिणामी दर दुप्पटीने वाढले असून, सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहे.

संबधित बातम्या :

सध्या ज्वारी, गहू, बाजारीसह डाळीचे दर वाढले आहेत. त्याव्यतिरिक्त भाजीपाला, खाद्यतेलाचे दरही वाढल्याने ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दैनंदिन वापरातील बऱ्याच वस्तू महागल्याने आर्थिक गणित जुळवितांना सर्वसामान्यांना कसरत करावी लागत आहे. अगोदर रशिया, युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धाचाही दरांवर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ३० ते ३५ रुपये किलोने मिळणारी ज्वारी थेट ६० रुपयांवर पोहोचली आहे. आरोग्यवर्धकतेमुळे ज्वारीला सातत्याने मागणी असते. मात्र, यंदा उत्पादन कमी झाल्याने बाजारात ज्वारीची आवक कमी झाली आहे. परिणामी दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, सर्वसामान्यांना ज्वारी खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. दुसरीकडे गव्हाच्या दरानेही ४० रुपये पार केले आहेत. तर बाजरीचे दर ४५ ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत. तांदूळ आणि डाळीचे दरही वाढल्याने महागाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

दुसरीकडे टोमॅटोचे दर सोडल्यास इतर भाजीपाल्याचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोनशे रुपये किलोवर गेलेला टोमॅटो किरकोळ बाजारात पाच रुपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे अवघड होऊन बसले आहे.

६० रुपयांत एक किलो चणादाळ

केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणाडाळ उपलब्ध करून दिली आहे. भारत सरकारने ‘भारत डाळ’ या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरू केली आहे. १ किलो पॅकसाठी ६० रुपये आणि ३० किलो पॅकसाठी ५५ रुपये प्रतिकिलो या अनुदानित दराने डाळीची विक्री सुरू आहे. वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बाजारात चणादाळ ८२ ते ८४ रुपये किलो दराने विकली जाते. मात्र, या सवलतीमुळे ग्राहकांना मोठा आधार मिळत आहे.

हेही वाचा :

The post ज्वारी खातेय भाव ; किरकोळ बाजारात ६० रुपये किलो दर appeared first on पुढारी.