तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

निवडणूक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येत्या ४ तारखेपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची तपासणी (फस्ट लेव्हल चेकिंग) हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक शाखेच्या सय्यद पिंप्री येथील गोदामात ही प्रक्रिया राबविली जाईल. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी देशपातळीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. युती व आघाड्यांवरून बैठकांचे सत्र झडत आहेत. देशात निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत आहे. त्याचवेळी प्रशासनानेही निवडणुकांसाठी शिल्लक असलेला कमी कालावधी विचारात घेत तयारीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट व ईव्हीएम‌्स उपलब्ध करून दिले आहेत. या मशीन्स‌च्या पहिल्या टप्प्यावरील तपासणीचे काम मंगळवार (दि. ४) पासून हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक शाखेच्या सय्यद पिप्री येथील गोदामात महिनाभर ही तपासणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १० हजार व्हीव्हीपॅट, ११ हजार ७२० कंट्रोल तसेच ६ हजार ६०० बॅलेट युनिटची तपासणी होणार आहे. भारत हेव्ही इलेक्ट्रिकल कंपनीच्या (भेल) आठ तंत्रज्ञांची टीम त्यासाठी महिनाभर नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.

अतिरिक्त मशीन्स येणार

जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सात हजार १०० व दुसऱ्या टप्प्यात तीन हजार असे एकुण १० हजार १०० व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याकरिता प्रत्येकी ३ हजार अतिरिक्त कंट्रोल व बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण appeared first on पुढारी.