तोटा घटवण्याचा उद्देश : डिजिटल स्क्रीनसह सिटीलिंक बससेवाच्या तिकिटांवर करणार जाहिरात

सिटीलिंक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपने सत्तेच्या अखेरच्या काळात मोठा गाजावाजा करून सुरू केलेली सिटीलिंक बससेवा पोसणे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. बससेवेचा तोटा साठ कोटींवर गेला आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाचे जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शहरातील बसथांब्यांना तेथील स्थानिक दुकानांची नावे दिली जातील. तसेच बसमधील डिजिटल फलकावर जाहिराती झळकतील. या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नातून सिटीलिंकचा तोटा कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मनपाने सिटीलिंकच्या माध्यमातून शहर व उपनगरीय परिसरात बससेवा सुरू केली आहे. सध्या २५० बसेस रस्त्यावर धावत आहेत. कोरोना संकटानंतर बससेवेला नाशिककरांची पसंती मिळत असून, सर्व मार्गांवरील बसेस गर्दीने भरलेल्या असतात. पण उत्पन्न प्राप्ती नव्हे, तर सेवा या उद्देशाने बससेवा चालविली जात असल्याने सिटीलिंकचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका खिशातील पैसा ओतून ही सेवा राबवत आहे. पहिल्या वर्षी सिटीलिंकचा तोटा ३५ कोटी होता. यंदाच्या अंदाजपत्रकात महापालिकेने सिटीलिंक प्रशासनाला 60 कोटींची मदत केली आहे.

या आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी सिटीलिंक प्रशासन प्रवाशांच्या मासिक पासवर जाहिरात घेण्याचा विचार सुरू आहे. तसेच शहरात 100 ते 150 बसथांबे आहेत. त्या ठिकाणी अनेक मोठी दुकाने, शाॅपिंग माॅल, रुग्णालये आहेत. त्यांचे नाव बसथांब्यांना देण्यात येईल. उद्घोषकावरून थांब्याच्या नावासोबत दुकानाचेही नाव पुकारले जाईल. जे दुकानदार यासाठी इच्छुक असतील, त्यांच्याकडून जाहिरात स्वरूपात वर्षभरासाठी ठाराविक शुल्क आकारले जाईल. तसेच बसमधील डिजिटल फलकावर जाहिरात केली जाईल. या प्रस्तावावर अंतिम टप्प्यात काम सुरू असून, लवकरच महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे. जेणेकरून तोटा भरून काढण्यास मदत होईल.

चकाचक बसथांबे

शहरातील जुन्या बसस्थानकांची मोठी दुरवस्था झाली होती. त्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने नवीन थांबे उभारण्याचे काम पुढील 10 वर्षांसाठी खासगी ठेकेदाराला दिले. त्यासाठी एकही रुपया ठेकेदाराला मोजला नाही. त्या बदल्यात बसथांब्य‍ांना जाहिराती मिळवून त्याचे उत्पन्न ठेकेदार घेणार आहेत. शहरात आता नवीन व आकर्षक बसथांबे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा:

The post तोटा घटवण्याचा उद्देश : डिजिटल स्क्रीनसह सिटीलिंक बससेवाच्या तिकिटांवर करणार जाहिरात appeared first on पुढारी.