‘त्या’ लाचखोर पोलिस निरीक्षकासह तिघांच्या जामीन अर्जावर 10 तारखेला निर्णय

न्यायालय www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच पोलीस कर्मचारी अशोक पाटील आणि नितीन मोहने या तिघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. या अर्जांवर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियंता गणेश पाटील यांनी हरकत घेतली असून जामिनाच्या निर्णयासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Dhule Bribe News)

दोंडाईचा येथील एका व्यक्तीवर कारवाई करणे टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सांगण्यानुसार कर्मचारी नितीन मोहने आणि अशोक पाटील या दोघांनी दीड लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात या तिघाही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांच्या वतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले. या अर्जावर आज न्यायालयात युक्तिवाद करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने ऍड गणेश पाटील यांनी या अर्जावर हरकत घेतली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी लाच स्वीकारली गेल्याची बाब त्यांनी न्यायालयात अधोरेखित केली. तसेच घर झडतील पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या घरातून दागिने तसेच खरेदीचे दस्त आढळून आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. लाचेच्या प्रकरणात अद्याप दोषारोप पत्र देखील दाखल झाले नसून जामीन देऊ नये, अशी हरकत पाटील यांनी घेतली. तर आरोपी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करीत असताना या प्रकरणाचा आवश्यक तो तपास करण्यात आला आहे. आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या पुढील तपासासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. तर पुढील तपासासाठी कोठडीत ठेवणे योग्य होणार नाही, त्यामुळे जामीन देण्यात यावा, असे न्यायालयात नमूद करण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.

हेही वाचा :

The post 'त्या' लाचखोर पोलिस निरीक्षकासह तिघांच्या जामीन अर्जावर 10 तारखेला निर्णय appeared first on पुढारी.