दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार

दहावी गुणपत्रिका,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने २ जूनला जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रतीक्षा कायम होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, मंगळवार (दि.१४)पासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन बारा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नव्हत्या. गुणपत्रिकाअभावी इयत्ता अकरावी वगळता इतर काही ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांसह पालकांचे म्हणणे होते. त्यामुळे लवकरात लवकर गुणपत्रिका मिळाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती. अखेर इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका वितरणाला मुहूर्त सापडला असून, १२ जूनला गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे.

दरम्यान, इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका वितरणाच्या नियोजनाच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. शाळांना सकाळी अकरा वाजता विभागीय मंडळाकडून गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर शाळांकडून दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अकरावी वगळता इतर शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेद्वारे तात्पुरता प्रवेश मिळू शकेल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार

शहरातील ६२ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ४८० जागांसाठी केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावीच्या निकालापूर्वीच अर्जाचा भाग एक भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. निकालानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास प्रारंभ झाला आहे. प्रक्रिया रेंगाळली होती. आता बुधवार (दि.१४)पासून गुणपत्रिका वितरित होणार असल्याने अकारावी प्रवेशप्रक्रियेलाही गती मिळणार आहे.

हेही वाचा :

The post दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार appeared first on पुढारी.