देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर

Kolhapur Guardian Minister Deepak Kesarkar

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की, साधारणत: पाच फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढते. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. मी, हे संकट टळू दे अशी प्रार्थना साईचरणी केली. त्यामुळे पाणीपातळी वाढली नाही. तसेच संभाव्य धोकाही टळल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या नाशिक विभागीय कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवाकडे प्रार्थना केल्याने कोल्हापूरला पूर आला नाही. याला अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा. एक फुटानेही पाणीपातळी वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाटबंधारे विभागाकडे तुम्ही चौकशी केली, तर 5-6 फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती. निसर्गात पण देव आहे. प्रार्थनेत ताकद आहे, अध्यात्म महत्त्वाचे असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा दौरा करत असताना शिर्डीमार्गे नाशिकला जाणार असल्याचे निश्चित झाले होते. दुसरीकडे, कोल्हापुरात पूरपरिस्थिती येते की काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, योगायोगाने मी शिर्डीला उतरलो. साईबाबांचे दर्शन घेतले. साईचरणी साकडे घातले आणि त्याच दिवशी पूरपरिस्थिती कमी झाली. पाऊस उघडल्याने राधानगरी धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. पावसाचा जोर कायम राहिला असता, तर अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असती, असे ना. केसरकर यांनी सांगितले.

पाणी-डांबर समीकरण जुळत नाही

नाशिक-मुंबई रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाणी आणि डांबर याचे समीकरण कधी जुळत नाही. सध्या काँक्रिटीकरण हे ध्येय आहे. त्यामुळे लवकरच खड्डे इतिहासजमा होतील. बांद्रा येथे जे पैसे खाणारे लोक होते, तेदेखील इतिहासजमा होतील, असे ना. केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर appeared first on पुढारी.