दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन

नाशिक दिवाळी अंक दै. पुढारी प्रकाशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही अधिकार्‍यांनी दिवाळीच्या अंकांच्या आठवणींना उजाळा देत ‘पुढारी’च्या या विशेषांकातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती, उत्तम मांडणी, वेगळा विषय याबद्दल कौतुक केले.

नाशिकला धार्मिक, पौराणिक संदर्भ लाभल्याने या शहरास राष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच, जिल्ह्यातील अनेक स्थळांनाही पुरातन, देदीप्यमान वारसा आहे. यांंचा सर्वांगीण धांडोळा या अंकात घेण्यात आला आहे. नाशिक महानगर आकारमानानुसार आणि लोकसंख्येनुसार वाढल्याने शहराची प्रगतीही झपाट्याने झाली. त्यामुळे नाशिकचा आढावा घेताना त्यातील ऐतिहासिक वास्तूंसह कालपरिवर्तक घटना, औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक असल्याची बाब ओळखून दैनिक ‘पुढारी’ने यंदाच्या दिवाळी अंकासाठी हेरिटेज ऑफ नाशिक या संकल्पनेवर आधारित विविध लेख वाचकांना सादर केले. त्यात नाशिकच्या नामकरणासह तेथील परिसरांची ओळख, नाशिकचे पूर्वीचे स्वरूप व विस्तार, ऐतिहासिक मंदिरे, पौराणिक परंपरा, सर्वधर्मीय संस्कृतीच्या पाऊलखुणा, विविध तालुक्यांमधील ऐतिहासिक दाखले, किल्ल्यांचा इतिहास, औद्योगिक वसाहतीची वाटचाल या विषयांवर प्रकाशझोत टाकला आहे. या अंकाची अभ्यासक, तज्ज्ञ, जाणकार यांनी प्रशंसा केली आहे.

सोमवारी (दि. 24) डॉ. पुलकुंडवार व नाईकनवरे यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. केवळ नाशिक शहरच नव्हे तर जिल्ह्याचा रंजक इतिहास या अंकात मांडला असल्याचे यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी नमूद केले. तसेच, अशा अंकांचे वाचक आणि माध्यमांसाठी असलेले महत्त्वही विशद केले. आयुक्त नाईकनवरे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत दिवाळी अंकाचे महत्त्व अधोरेखित केले. बालपणी दिवाळी अंकासाठी असलेली प्रतीक्षा, अंकाची अदलाबदल करून वाचनाची भूक कशी भागवली जात होती याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. यावेळी निवासी संपादक प्रताप म. जाधव, युनिट हेड प्रल्हाद इंदोलीकर, चीफ रिपोर्टर ज्ञानेश्वर वाघ, प्रतिनिधी गौरव अहिरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन appeared first on पुढारी.