धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

घोटाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असताना त्यात बुधवारी आणखी दोघांना निलंबित करत एकूण सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लीना बनसोड यांनी विजय गांगुर्डे (प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार), गोकुळ राठोड (प्रतवारीकार संस्था पळशिण, ठाणे ग्रामीण), आशिष वसावे (व्यवस्थापक, प्रशासन व विपणन, शहापूर), गुलाब सदगीर (प्रतवारीकार, उपप्रादेशिक कार्यालय, शहापूर ) यांना निलंबित केले होेते. आज सखाराम जाधव ( आविवि सहकारी संस्था, पळशिण येथील खरेदी केंद्रप्रमुख) आणि भरत घनघाव (संस्था सचिव, ठाणे) यांनाही निलंबित करत या सर्व सहा जणांविरुध्द शहापूर येथील पोलिस ठाण्यात धान खरेदीतील गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

ठाण्याचे भाजप आ. संजय केळकर, ॲड. पराग अळवणी यांनी या महामंडळातील घोटाळ्यावर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्याची मागणी केली होती. राज्य शासनाने बनसोड यांना चौकशी करण्याचे आदेश आले होते. त्यानंतर बनसोड यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जव्हार, शहापूर या प्रादेशिक कार्यालयांमध्ये झालेल्या धान खरेदीत अनियमितता झाल्याचे समोर आले. त्यामुळे बनसोड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

केंद्र शासनाच्या २०२०-२१ आणि २०२१-२२ मधील योजनेत आदिवासी विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने १३७ कोटी रुपयांची धानखरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. दुसरीकडे रोज एक हजार ते पाच हजार क्विंटलपर्यंत खरेदी दाखवण्यात आली. इतर राज्यातील तांदूळ आणून कागदोपत्री धान्य जावक दाखवली आहे. दोन वर्षांत अनुक्रमे ४४ हजार क्विंटल आणि अडीच लक्ष क्विंटल घट आली असून बोगस धान्य खरेदीचा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर सक्षम मिलर्स असताना जळगाव आणि औरंगाबाद येथील मिलर्सना भरडाईचे काम देण्यात आल्याचा आरोप केळकर यांनी केला होता. आमदार संजय केळकर यांनी हा विषय सातत्याने विधानसभेत मांडून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा : 

The post धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.