धुळे : अकरा गावातील वाढीव मालमत्ता कर सरकारने भरावा अन्यथा रद्द करावा – आ.कुणाल पाटील

धुळे महानगरपालिका www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 11 गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा प्रश्‍न विधानभवनात पुन्हा तापला आहे. महापालिकेने कोणतीही सुविधा दिलेली नसतांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटीसा दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे वाढीव कर रद्द करावा किंवा सरकारने या करासाठी निधीची तरतूद करुन सरकारनेच हा वाढीव मालमत्ता कर भरण्याची मागणी धुळे ग्रामीण आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात केली.

दरम्यान, शहरातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी. धुळे तालुक्यासह जिल्हयातील आणि धुळे शहरातील विकासाला चालना मिळावी म्हणून पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्‍न मांडून ते सोडविण्याची मागणी केली. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. त्या अनुषंगाने धुळे शहर हद्दवाढीतील 11 गावांचा मालमत्ता कर वाढीसोबतच धुळे शहराचा पाणी प्रश्‍न, रस्ते,कचर्‍याचा प्रश्‍न पुन्हा तापला. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करीत आ.कुणाल पाटील यांनी या प्रश्‍नांवर आवाज उठवित तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. यावेळी अधिवेशनात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 11 गावांचा धुळे महानगरपालिका हद्दीत समावेश झाला. या गावातील रहिवाशांना मालमत्तांना वाढीव कर आकारण्यात आल्याने जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. मुलभूत सुविधांबरोबर या 11 गावांमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. पाणी प्रश्‍न,रस्ते,पथदिवे, गटारी,शौचालय,आरोग्य,स्वच्छता, अशी तत्सम कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. तरीही धुळे महानगरपालिकेने येथील रहिवाशांना वाढीव मालमत्ता कर वाढीच्या नोटीसा दिल्या आहे. विकास कामे नसल्याने वाढीव कर का भरावा, असा सवाल येथील नागरीक करीत आहेत. दरम्यान धुळे शहरवासिंयाना पाण्याचा प्रश्‍न नेहमीच सतावत असतो, शहरात 8 ते 15 दिवसात पाणी पुरवठा होत असतो. धुळे शहराचा पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा योजना करण्यात येत आहे. या योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. म्हणून या योजनेच्या कामाला गती देऊन धुळे शहराचा पाणी प्रश्‍न सोडवावा अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली. धुळे शहरात भुमिगत गटारींचे काम महापालिकेकडून केले जात आहे. मात्र मध्यंतरी ही योजना अर्धवट सोडल्याने शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले आहे. शहरात रस्ते खोदले गेल्याने सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. परिणामी लोकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे. वाहनेही जाऊ शकत नाही. त्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती शहरात आहे. त्यामुळे रखडलेल्या भुमीगत गटारींच्या योजनेकडून लक्ष घालून रस्त्यांचे काम करण्याचीही मागणी आ.पाटील यांनी यावेळी केली.

धुळ्याचा कचरा प्रश्‍न विधानभवनात

धुळे शहरात वाढत चाललेले घाणीचे साम्राज्य आणि कचर्‍याच्या प्रश्‍नाने नेहमीच धुळेकरांना सतावले आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न गाजत आहे. आ.कुणाल पाटील यांनी मांडत पुन्हा एकदा कचरा प्रश्‍न तापला आहे. विधानभवनात झालेल्या भाषणात आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळ्यात कचरा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र अस्वच्छता निमार्ण झाली आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. कचरा ठेकेदाराने कोणतेही काम केले नसल्याने त्याला वाचा फोडण्याचे काम या पदाधिकार्‍यांनी केले. त्यामुळे धुळे शहर स्वच्छ रहावे, नागरीकांच्या आरोग्य सदृढ व निरोगी रहावे म्हणून धुळे शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न तत्काळ सोडवावा अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली.

हेही वाचा:

The post धुळे : अकरा गावातील वाढीव मालमत्ता कर सरकारने भरावा अन्यथा रद्द करावा - आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.