धुळे : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

कांदा उत्पादक,www.pudhari.news

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल रुपये 350 व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पणन संचालक यांनी अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ज्या शेतक-यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेडकडे लेट खरीप लाल कांदा विक्री केलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणी अर्ज 30 एप्रिलपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोज चौधरी यांनी केले आहे.

कांदा अनुदान मागणी अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेडकडे व तालुका उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये विनामूल्य मिळेल. विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (खाते क्रमांक व आयएफएससी कोड सह), आधारकार्डची झेरॉक्स प्रत, सहमती असणारे शपथपत्र. तसेच ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियाच्या नावे आहे. व ७/१२ उतऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे. अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीचे शपथ पत्र अर्जासोबत जोडावे. याबाबत ७/१२ उतारा ज्यांचे नावे असेल. त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल, असेही जिल्हा उपनिबंधक चौधरी यांनी कळविले आहे.

हेही वाचा 

The post धुळे : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.