धुळे : कार्तिकी यात्रोत्सवात कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले

कन्नेैयालाल महाराज,WWW.PUDHARI.NEWS

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आमळी येथील कार्तिकी यात्रोत्सव काळात श्री कन्हय्यालाल महाराजांचे दर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी  मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी काळात लाखोंच्या संख्येने भाविक आमळीला येत असतात. कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा शुक्रवारी (दि. ४) होणार आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या श्री. कन्हय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या कालावधीत नित्यपूजा सुरु राहतील. गेल्या महिनाभरापासून सर्व अकरा मंदिराची रंगरंगोटी व सजावटीची कामे सुरू होती ती पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टतर्फे विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.

आमळी यात्रोत्सवात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातील व्यापारी व भाविक येथे दर्शनासह नवसपूर्ती व व्यवसायासाठी दाखल होतात. यात्रोत्सवातून कोट्यवधी रुपयांची मोठी उलाढाल होते. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा यात्रोत्सव होत आहे. यामुळे भाविक व व्यावसायिकांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. भाविक व व्यावसायिक आतापासूनच मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. दरवर्षी या यात्रोत्वात मनोरंजनपर विविध साधने, हॉटेल, संसारोपयोगी साहित्य,  कपडे, सौंदर्यप्रसाधने, धार्मिक साहित्य, उंच पाळणे, भांडी आदी दुकानांची मोठी रेलचेल असते. यंदाही व्यावसायिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त व मंदिर समितीतर्फेही सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

The post धुळे : कार्तिकी यात्रोत्सवात कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले appeared first on पुढारी.