धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

धुळे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने ते रस्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी (दि.२५) सकाळी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातला आहे. अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने धुळे ‘मनपा’कडे या मोकाट गुरांवर आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात येते आहे. मात्र, धुळे मनपा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. आता मोकाट कुत्र्यामुळे ५५ वर्षीय महादू कदम यांना आपला जीव गमावा लागला आहे. त्यामुळे धुळेकर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

The post धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.