धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेने केली असून या आरोपीकडून एक मशीन गन, वीस पिस्टल आणि 280 जिवंत काढतुस जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून हा शस्त्रसाठा नेमका या आरोपीने कशासाठी आणला होता. या दिशेने ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्याराच्या तस्करी प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना यात सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग, (राहणार उमरटी , पोस्ट बलवाडी ,तालुका वरला ,मध्य प्रदेश,) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. हा आरोपी धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मोठा शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस आयुक्त जयजितसिंग ,सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे आणि शिवराज पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त निलेश सोनवणे यांना दिली. त्यानुसार फरार आरोपी सुरजित सिंग उर्फ माजा याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकाला पळासनेर येथे पाठवण्यात आले. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, उपनिरीक्षक सुनील अहिरे, संदीप शिंदे, रोहिदास रावते ,सुनील निकम, शशिकांत नागापुरे, विजय पाटील आदी पथकाने सापळा लावला. यावेळी या पथकाने पळासनेर परिसरात सापळा लावला. यात सुरजितसिंग हा पळासनेर येथे आढळून आला. त्याला या पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून वीस गावठी बनावटीचे पिस्टल, एक गावठी बनावटीची मशीनगण, दोन मॅक्झिन व 280 जिवंत काढतुस असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात हजर केले असता त्याला 18 जुलै पावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले आहेत.

मध्यप्रदेशात बनावट शस्त्र निर्मितीचे केंद्र

मध्यप्रदेशमधून यापूर्वी शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रकार अनेक कारवाईंमधून उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातील उमरटी या गावात मोठ्या प्रमाणावर गावठी बनावटीचे शस्त्र तयार केले जात असून या शस्त्रांची तस्करी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये केली जात असल्याचा प्रकार यापूर्वी झालेल्या पोलीस कारवायांमधून निदर्शनास आला आहे. धुळे जिल्ह्यात देखील मध्य प्रदेशातील याच गावांमधून शस्त्रांची तस्करी झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रातील पोलिसांनी उमरटी गावातील शस्त्र तयार करण्याचे केंद्र उध्वस्त देखील केले होते .मात्र आता पुन्हा या गावांमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची तस्करी सुरू झाल्याने पोलिसांची ही डोकेदुखी वाढली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्याचा तपास पळासनेरपर्यंत येऊन पोहोचला. या गुन्ह्याच्या तपासात मोठा शस्त्रसाठा आढळून आल्याने या गुन्ह्यातील आरोपी हे शस्त्र नेमके कुणासाठी वापरणार होते या दिशेने आता तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक appeared first on पुढारी.