धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Bribe

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

शेतजमिनीची कौटुंबिक वाटणी होण्यासाठी लाचेची मागणी करणारा जैताणे मंडळ तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी (वर्ग ३ महसूल विभाग) विजय वामन बावा (वय ४६) यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरलेल्या लाचेतील उर्वरीत सात हजाराची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

तक्रारदार यांची साक्री तालुक्यातील मौजे भामेर येथे गट नं.४३ व गट नं.४४ अशी शेत जमीन आहे. या शेत जमिनीची त्यांना मुलगा व पत्नी यांचे नावे वाटणी करावयाची असल्याने त्यांनी निजामपूर भागाचे मंडळ अधिकारी विजय बावा याची दि. २३ मार्च रोजी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या कामासाठी १८ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यापैकी आठ हजार रूपये घेवून काम करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अडीच महिने होवून देखील काम न झाल्याने तक्रारदार यांनी पुन्हा विजय बावा यांची भेट घेतली. तेव्हा उर्वरीत दहा हजार रूपयांची मागणी बावा यांनी केली. त्यानंतर हैराण झालेल्या तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून घडलेला वृत्तांत कथन केला. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात (दि.१६) शहानिशा करून तक्रारीत तथ्य आढळल्याने सापळा रचून लाचेची उर्वरित रक्कम घेताना मौजे भामेर येथे राहत्या घरी पकडले.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा वालावलकर, माधव रेड्डी व नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरिक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण,  राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागूल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने कारवाी केली.

हेही वाचा : 

The post धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.