धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर-ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी शासनाच्या अधिसुचनेवर स्थानिक आदिवासी बांधवांनी हरकत घेत जिल्हाधिकारी, आमदार, पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, पिंपळनेर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन विरोध व हरकत घेतली आहे.

ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषद रूपांतर करण्याच्या अधिसूचनेवर 30 दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी हरकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी 2 नोव्हेंबर ही शेवटची मुदत होती. त्याआधी स्थानिक आदिवासी बांधवांनी विरोध दर्शवत जिल्हाधिकारी अभिनव गोयल, आमदार मंजुळा गावीत, सरपंच देविदास सोनवणे ,ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळकर, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांच्याकडे हरकत नोंदवली आहे. यामुळे हा विषय अजून लांबणीवर जाणार आहे.

हरकतीत म्हटले आहे की, पिंपळनेर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे. पेसा कायद्याने पिंपळनेर ग्रामपंचायतीतर्फे आदिवासी समाजाला सर्व सामान्यांच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे, त्याला शह देण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. हरकत स्थानिक आदिवासी समाजाचे मा.ग्रां.पं.सदश्य पोपट गांगुर्डे, मा.ग्रां.पं.सदश्या हिराबाई देसाई, कैलास देसाई, संजय मंगल ठाकरे, अजय राऊत, आदिवासी एकता परिषदेचे प्रेमचंद सोनवणे, रामू गायकवाड आणि समाज बांधवांनी हरकत घेतली आहे.

हेही वाचा :

The post धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत appeared first on पुढारी.