धुळे बाजार समितीमधील शेतीमालाची चोरी रोखण्यासाठी आता रात्रीची पोलिस पेट्रोलिंग

धुळे बाजार समिती,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून शेतकर्‍यांचा शेतीमाल व व्यापार्‍यांचा खरेदी केलेला शेतीमाल चोरी होतो. सदर मालाची चोरी रोखण्यासाठी आता बाजार समितीत रात्रीचे पेट्रोलिंग केले जाणार असल्याचे धुळे सहाय्यक पोलिस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांनी सांगितले. याबाबतची मागणी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी केली होती. दरम्यान दि.20 जून ते 29 जून दरम्यान निरुपयोगी व भाकड जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार असून शेतकरी अथवा व्यापार्‍यांनी अशी जनावरे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन सभापती पाटील यांनी यावेळी केले.

बकरी ईदच्या पावन पर्वावर बाजार समितीच्या आवारात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आज धुळे सहाय्यक पोलिस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी बाजार समिती आवारात भेट दिली. त्यानिमित्ताने बाजार समितीच्या सभागृहात सभापती बाजीराव पाटील तसेच संचालक व बाजार समितीच्या प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी येणार्‍या ईद सणानिमित्ताने धुळे शहरासह बाजार समिती आणि त्या परिसरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी विविध सूचना देत आढावा घेण्यात आला. दरम्यान आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यात शेतीमालाची चोरी रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा सूचनाही आ.पा टील यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

यावेळी सभापती बाजीराव पाटील यांनी सांगितले कि, बाजार समितीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विक्रीसाठी आणलेल्या शेतीमालाची चोरी चोरटे करतात. त्यामुळे ही चोरी रोखण्यासाठी पोलिस खात्यामार्फत वाहनाव्दारे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात यावी जेणेकरुन चोर्‍या रोखता येतील. शेतकरी व त्यांच्या मालाच्या रक्षणाचा प्रश्‍न लक्षात घेवून धुळे सहाय्यक पोलिस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी तातडीने निर्णय घेत पेट्रोलिंगची मागणी मान्य केली. ईदच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन रेड्डी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, संचालक विजय चिंचोले, महादेश परदेशी, भागवत चितळकर, माजी संचालक गंगाराम कोळेकर, प्रभारी सचिव देवेंद्र पाटील, सहाय्यक सचिव विशाल आव्हाड, देवेंद्रसिंग सिसोदिया आदी उपस्थित होते.

दहा दिवस भाकड जनावरांची विक्री बंद

दि.20 जून ते 29 जून 2023 पर्यंत बाजार समितीच्या आवारात निरुपयोगी बैल, गोर्‍हा ,गाय व भाकड जनावरे यांचा खरेदी विक्रीचा व्यापार व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे. तरी अशी जनावरे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post धुळे बाजार समितीमधील शेतीमालाची चोरी रोखण्यासाठी आता रात्रीची पोलिस पेट्रोलिंग appeared first on पुढारी.