धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन

बोगस बियाणे, खत विक्री

धुळे : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये याकरीता जिल्ह्यात 5 भरारी पथके तयार केली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली आहे.

बियाणे, खते व किटकनाशकांचा गुणवत्तायुक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण सुविधा केंद्र दि. 15 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी स्थापना करण्यात आले आहे. या कालावधीत तक्रार निवारण सुविधा केंद्रावर दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत ९५०३९३८२५३ (Helpline) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रारदार शेतकरी तक्रार नोंदवू शकणार आहेत. जिल्हा कृषि विभागाकडून खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर 4 व जिल्हास्तरावर 1 अशी एकुण 5 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

भरारी पथकामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. या कालावधीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट नंबर शेतकन्यांनी पडताळून पहावे. तसेच पेरणी झाल्यावर सदर बियाणे पाकिटे पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. अनधिकृत बियाणे खरेदी करू नये. किटकनाशके, तणनाशके इ. खरेदी करतांना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. गाडीवरून खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खत खरेदी करू नये. कुठे असे फ्लाय सेलर्स आढळले तर तत्काळ ९५०३९३८२५३ (Helpline) या भ्रमणध्वनी क्रमांकावर कळवावे. खत खरेदी करतांना रीतसर बिल घ्यावे. जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीया सारख्या अनुदानित खतांची विक्री करत असल्यास तसेच झिरो बिल पावती वर खत विक्री करत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार जिल्हा कृषि कार्यालयास अथवा तालुका कृषि कार्यालयास करावी. असेही तडवी यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन appeared first on पुढारी.