धुळे : भगवान विमलनाथ यांच्या मूर्तीचा वाद उफाळला; मुख्य मंदिरातून मूर्ती हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

जैन तीर्थक्षेत्र बळसाणे ता. साक्री येथे जैन धर्माचे भव्य असे मंदिर आहे. या मंदिरात असलेली श्री विमलनाथ भगवान यांच्या मूर्तीचा पुन्हा वाद उफाळून आला आहे. ही मूर्ती गावाच्या मुख्य मंदिरातून  बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. काल बळसाणे येथे या विषयावर (दि.२५) रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर चौकात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर हलोरे यांनी सांगितले की, ही मूर्ती फक्त जैन धर्माचे श्रद्धास्थान नसून गावातील सर्व समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे. ही मूर्ती गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही, यासाठी ग्रामपंचायतीने आज ग्रामसभा घेऊन ठराव केला आहे. मूर्ती हलवू दिली जाणार नाही यावर उपस्थित नागरिकांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून बहुमत सिद्ध केले आहे.  तरीही श्री. विमलनाथ भगवान यांची मूर्ती गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण? 

जैन तीर्थक्षेत्र बळसाणे ता. साक्री येथे जैन धर्माचे भव्य असे प्राचिन मंदिर आहे. शितलनाथ संस्थान ट्रस्टने या मंदिरातील श्री विमलनाथ भगवान यांची प्राचीन मूर्ती तेथील मंदिरातून हलवून गावाच्या बाहेर भव्य मंदिर बांधून तिथे प्राणप्रतिष्ठा करावी याने गावाचा व तीर्थक्षेत्राचा विकास होईल असे सांगून यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  याला गावातील लोकांनी तीव्र विरोध दर्शवत गावातील मूर्ती स्थलांतरित होऊ देणार नाही असे एक मुखाने ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने हातवर करून मतदान केले असून मूर्ती स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे गट नेते ज्ञानेश्वर हालोरे होते. ग्रामसभेला सरपंच जयश्री ज्ञानेश्वर हालोरे, उपसरपंच मनकोरबाई खांडेकर उपस्थित होते. ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने कैलास चव्हाण, भिमराज खांडेकर, मोहन गिरासे, भागचंद जैन, शानाभाऊ पाटील, ज्योसना धनगर, बनाबाई पाटील, हरीश धनुरे, कल्याणी जैन आदींनी आपले म्हणणे मांडले. ग्रामसेवक संदीप देसले यांनी ठराव केलेली प्रोसीडींग वाचून दाखवली ठरावाच्या बाजूने बहुमत सिद्ध झाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नाना सिसोदे यांनी केले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post धुळे : भगवान विमलनाथ यांच्या मूर्तीचा वाद उफाळला; मुख्य मंदिरातून मूर्ती हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध appeared first on पुढारी.