धुळे : भामेरच्या दोघी बहिणी झाल्या अधिकारी ; मोठी पीएसआय तर लहान आयुर्विमा अधिकारी

दोघी बहिणी झाल्या अधिकारी,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बळसाणे भामेर येथील रहिवासी विठ्ठल येलजी सोनवणे यांच्या दोन्ही कन्या एमपीएससी परीक्षा पास होऊन अधिकारी झाल्या आहेत. यात मोठी मुलगी नम्रता सोनवणे ही पोलिस उपनिरीक्षक झाली आहे. तर लहान मुलगी जयश्री सोनवणे ही एलआयसी मध्ये आयुर्विमा अधिकारी झाली आहे. घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही बहिणींनी यश संपादन केल्यामुळे गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विठ्ठल सोनवणे यांना दोन मुली असून मुलगा नाही. मात्र या मुलींनी मुलाप्रमाणे यश संपादन केले आहे. सध्या सोनवणे कुटुंबीय रोजगारासाठी नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. घरची प्रतिकूल परिस्थिती असताना विठ्ठल सोनवणे यांनी मुलींना उच्च शिक्षित केले. तर मुलींनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे.

माळी समाजातील या दोघी बहिणींनी यश संपादन केल्याने राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नम्रता व जयश्री यांचा सत्कार केला. तसेच या यशाबद्दल भामेरचे सरपंच मनोज सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत वाघ, उद्योजक लक्ष्मीकांत शाह, ललित आहुजा, खुदाबक्ष शेख, दयानंद सोनवणे, रामकृष्ण सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

The post धुळे : भामेरच्या दोघी बहिणी झाल्या अधिकारी ; मोठी पीएसआय तर लहान आयुर्विमा अधिकारी appeared first on पुढारी.