धुळे: ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानास बोराडी गावातून सुरूवात

dhule

धुळे, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे उद्धटन आज ( दि. ९) शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत 9 ते 15 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक शिलाफलक उभारायचे आहे. या शिलाफलकावर त्या गावातील देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा वीर, वीर जवानांचे नावाचा उल्लेख करावयाचा आहे. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीताचे गायन करावयाचे आहे. त्यानंतर याठिकाणी पंचप्रणची शपथ घ्यावयाची आहे. तसेच याठिकाणी 75 वृक्षाची लहान ‘अमृत वाटिका’ तयार करायची आहे. मातीला व वीर सेनानींना वंदन करण्यासाठी हा शासनाने एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांची माहिती दिली. तसेच बोराडी गावात हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्याचे आभार मानले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते बोराडी गावातील ग्रामपंचायत हद्दीत शिलाफलक, वसुंधरा वंदन, जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा व क्रांतीविर ख्वाजा नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर व्यंकटराव रंधे यांच्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांना व वीरांना वंदन करून, पंचप्रण अर्थात शपथ घेण्यात आली. त्यासोबतच ध्वजारोहण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वसुंधा वंदनसाठी मुस्लिम कबरस्थानात ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करणे, सर्वांनी पंच शपथ घेतली, माती कलशात भरून कलश पूजन करण्यात आले.

याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यात थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांचे नातू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सीमाताई रंधे, निशांत रंधे, राहुल रंधे, शशांक रंधे, रोहिणी रंधे यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर भिलाभाऊ कुवर यांचे नातू नंदकिशोर कुंवर, मनिषा कुंवर व भिकन भदाणे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, जिल्हा परिषदेचे शिक्षक, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

The post धुळे: ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानास बोराडी गावातून सुरूवात appeared first on पुढारी.