धुळे : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात-आ.कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यासह जिल्ह्यातही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांमुळे नागरीक व जनावरांच्या मृत्यचे तसेच जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे वनक्षेत्रालगत असलेल्या पिकांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणार्‍या हानीपासून रक्षण व्हावे. म्हणून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे. दरम्यान वनक्षेत्रालगत असलेल्या शेतीतील पिकांची वन्यप्राण्यांमुळे नासधुस होत आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील त्रूटी दूर करुन शेतकर्‍यांना तत्काळ लाभ देण्याची मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आ.कुणाल पाटील यांनी तारांकीत प्रश्‍नातून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्यांनी म्हटले की, धुळे तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांचे शेतजमीनी वनक्षेत्रालगत आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही वनक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील रानडुक्कर, बिबट्या, कोल्हे, लांडगे असे वन्यप्राणी रात्री अपरात्री शेतात येतात. हे प्राणी अचानक शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजुर यांच्यावर हल्ला करतात. त्याचप्रमाणे जनावरांवरही हल्ला करत आहेत. या हल्ल्यात अनेक वेळा जिवितहानी होते. तसेच वन्यप्राणी शेतात घुसून उभ्या पिकांची नासधुसही करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून सरंक्षण व्हावे म्हणून वन विभागाने प्रभावी उपाययोजना राबवावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, वनक्षेत्रालगत असलेल्या शेतीच्या सरंक्षणासाठी शेतकर्‍याला वैयक्तिक लाभातून कुंपण योजना मंजुर करावी अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे.

किसान सन्मान योजनेत त्रूटी-

आ.कुणाल पाटील यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील त्रुटींबाबत दूर करण्याची मागणी केली. किसान सन्मान योजनेचे काम गेल्या तीन महिन्यापासून बंद असून अनावश्यक त्रूटी काढून शेतकर्‍यांना हेलफाटे मारावे लागत आहेत. आधार लिंक, केवायसी इ.तांत्रिक कारणांमुळे लाभार्थी वंचित राहत आहेत. त्यामुळे या योजनेच्या कामाला गती देवून शेतकर्‍यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

The post धुळे : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात-आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.