धुळे : शुकुल कंपनीप्रकरणी परताव्याचे आमिषाबाबत फसवणुकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता

पैशाचे आमिष www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फसवणुकीचा आकडा 70 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. यामध्ये सहा आरोपींनी 4400 गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली असून फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर संबंधितांनी पोलीस प्रशासनाला संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

शुकुल ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून प्रदीप शुक्ला, धनंजय बराड, दुर्गेश तिवारी, संदीपकुमार पटेल यांनी पूर्वनियोजित कट केला. या कंपनीत पैसे गुंतवल्यास जादाचा परतावा दिला जाणार असल्याची प्रसिद्धी त्यांनी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली. त्यासाठी दोंडाईचा येथे राहणारे मंगेश नारायण पाटील, आकाश मंगेश पाटील या दोघा बापलेकांची वसुलीसाठी नियुक्ती केली. तसेच सर्व सहा जणांनी गुंतवणूकदारांना आठ ते नऊ टक्के आकर्षक दराने परतावे मिळतील असे आमिष दाखवले. विशेष म्हणजे गुंतवणुकीची रक्कम ही ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांनी ऑनलाईन पद्धतीने या कंपनीत पैसे गुंतवले. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात त्यांना आकर्षक परतावा देण्यात आला. त्यामुळे परिसरात मौखिक प्रसिद्धी झाल्यामुळे गुंतवणूकदार देखील वाढले. केवळ धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून 4400 गुंतवणूकदारांनी कंपनीत 70 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली. याप्रकरणी  मंगेश पाटील आणि आकाश पाटील या दोघांना अटक केली असून कंपनीच्या मुख्य संचालकांना अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य संचालकाच्या अटकेनंतर फसवणूक झालेले गुंतवणूकदार तसेच फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान या कंपनीत पैसे गुंतवल्याने फसवणूक झाली असल्यास तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले आहे.

सेबी अलर्ट झाल्याने फसवणूक उघड

दरम्यान कंपनीच्या संचालकांनी गुंतवलेला पैसा शेअर बाजारात अडकवला. मात्र शेअर बाजारातील त्यांची उलढाल 100 कोटीच्या पुढे गेल्यामुळे सेबी अलर्ट मोडवर आली. सेबीने या बँक खात्याची चौकशी केली असता त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांमधूनच शुकुल कंपनीच्या संचालकांनी शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची बाब निदर्शनास आली. परिणामी सेबीच्या अनेक नियमांचा भंग झाल्याची बाब पुढे आल्याने या बँक खात्यावर निर्बंध लादण्यात आले. गुंतवणूकदारांची रक्कम तातडीने परत करावी किंवा बँकेच्या खात्यात संचालकांनी भरावी, असे सेबीने सुचवले. मात्र सुरतच्या या कंपनीच्या संचालकांनी ही बाब पाळली नसल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत देणे थांबले. परिणामी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

गुंतवणुकीच्या पैशातून चित्रपट निर्मिती : शुकूल कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला पैशाच्या माध्यमातून तब्बल गुजराती भाषेत तीन चित्रपट तयार केल्याची माहिती पुढे आली. यातील ‘नाडी दोष’ हा चित्रपट चांगला चालला. तर ‘राडो’ आणि आणखी एक चित्रपट आपटला. परिणामी गुंतवणूकदारांचे पैसे देखील लटकले. एकट्या खानदेशातून 56 कोटी तर उर्वरित महाराष्ट्रातून 14 कोटी रुपये असे 70 कोटी रुपये धोक्यात आल्याने आल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली आहे. हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post धुळे : शुकुल कंपनीप्रकरणी परताव्याचे आमिषाबाबत फसवणुकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.