धुळे : सराफ दुकानातून एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना शहरातील सराफ पेठेतील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. धुळे महानगरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे गस्त देखील वाढवण्यात आली होती. मात्र, धुळे महानगरातील सराफ पेढीतील दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

आग्रा रोडवर बॉम्बे लॉजच्या जवळ प्रकाश जोरावरमल चौधरी आणि सरदार जोरावरमल चौधरी यांचे सुवर्ण पॅलेस हे सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानाच्या सुरक्षेसाठी रखवालदाराची नेमणूक देखील करण्यात आली आहे. मात्र, रखवालदार हा त्याच्या मुलीच्या प्रवेशासाठी पुणे येथे एका दिवसासाठी जाणार असल्याने काल रात्री रखवालदार ड्युटीवर नव्हता. नेमकी हीच संधी चोरट्याने साधली. आज पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गस्तीवर असणारी पोलिस गाडी आग्रा रोडवरील दुकानां समोरून जात असताना या गाडीने सायरन वाजवला. यावेळी बॉम्बे लॉज जवळील हॉटेल गजानन च्या समोरून त्यांना दुचाकी वर दोन जण आणि अन्य एक जण पळून जात असताना निदर्शनास आला. त्यामुळे पोलीस गाडीतील दोघा कर्मचाऱ्यांना संशय आला. या तिघाही चोरट्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने बांधलेले होते.

त्यामुळे पोलीस गाडी गजानन टी स्टॉल जवळील बोळीत गेली असता त्यांना सुवर्ण पॅलेस दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे काहीतरी अघटीत घडण्याचा त्यांना संशय आला. या पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकान मालक चौधरी यांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस नाईक रवी राठोड, पंकज खैरमोडे, सुनील शेंडे, यांच्यासह आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील हे पथकासह पोहोचले. पोलीस पथकाने पाहणी केली असता चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर मुख्य केबिनचे काच फोडून काचेच्या काउंटर च्या ब्लॉकमध्ये ठेवलेले ८०० ग्राम वजनाचे सोने तसेच सोने आणि चांदीचे अन्य दागिने लंपास केल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान घटनेची माहिती कळाल्याने दुकान मालक देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे सुमारे एक कोटी दहा लाखाचे दागिने चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली.

दरम्यान, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत असतानाच दुकानातील सीसीटीव्हीतील कॅमेऱ्याची वायर तोडून कॅमेरे देखील नुकसान केले. कॅमेऱ्यामध्ये चेहरे येऊ नये यासाठी त्यांनी आधीच तोंडाला कापड बांधल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी फॉरेनसिक लॅब चे धनंजय मोरे तसेच ठसे तज्ञांना देखील पाचारण केले. या सराफ पिढीच्या तिजोरीमध्ये तसेच वरच्या मजल्यावर देखील मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. मात्र चोरट्यांनी केवळ विशिष्ट ड्रॉवरच्याच मधील दागिने चोरले. त्यानंतर पलायन केले. यावरून सहज उपलब्ध होणारे दागिने माहितगार असणाऱ्या चोरट्यांनी चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. या दिशेने आता पोलीस तपास सुरू झाला आहे.

हेही वाचलंत का?

The post धुळे : सराफ दुकानातून एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास appeared first on पुढारी.