नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

अमृत योजना,www.pudhari.news

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या तीनशे कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी पाईप कोणता वापरायचा यावरुन ही महत्वकांक्षी योजना रखडली आहे. जीवन प्राधिकरण प्लास्टिक पाईपसाठी तर महापालिका लोखंडी पाईपसाठी आग्रही आहे. महापालिकेने लोखंडी पाईपसाठी पाठवलेला प्रस्ताव जीवन प्राधिकरणने फेटाळल्याचे समजते.

सद्यस्थितीत शहरातील जलवाहिन्या तीस वर्षांपुर्वी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाणी गळतीसह ठिकठिकाणी त्यात बिघाड पहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने अमृत – २ योजनेअंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी व पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी  तीनशे कोटिंचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. त्यास मंजुरी मिळाल्याने तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव मागील दोन महिन्यांपुर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला होता. त्यास तांत्रिक मान्यता मिळाल्याने योजनेचा मार्ग मोकळा झाला होता. पण ही योजना राबविताना प्लास्टिकचे पाईप वापरण्याची अट आहे. पण महापालिका लोखंडी पाईपसाठी आग्रही आहे. पाईप कोणता वापरायचा यावरुन योजनेची अंतिम मंजुरी रखडली आहे. प्लास्टिक पाईपचा टिकाऊपणा फारसा नसतो. चार ते पाच वर्षातच हे पाईप तुटण्याची भिती असते. शिवाय शहरात वर्षभर कुठेना कुठे विविध योजनांचे काम करण्यासाठी रस्ते जेसीबीने खोदले जातात.त्यावेळे प्लास्टिक पाईपचे मोठे नूकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे महापालिकेची पसंती ही लोखंडी पाईपला आहे. त्यासाठी नवा फेरप्रस्ताव जीवन प्राधिकरणला पाठविण्यात आला होता. शिवाय लोखंडी पाईपसाठी पन्नास कोटी जादाचा खर्चाची मागणी करण्यात आली.पण जीवन प्राधिकरणाने हा प्रस्ताव फेटाळत प्लास्टिकचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या योजनेचे अंतिम मंजुरीला ब्रेक लागल्याचे समजते.

हेही वाचा :

The post नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची 'अमृत' योजना रखडली appeared first on पुढारी.