नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार ‘झाडूसेना’

नंदुरबार,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा| अजित पवार यांनी राज्यात घडवलेला भूकंप त्या पाठोपाठ मंत्रिमंडळात चाललेले फेरबदल यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. असे असतानाच आम आदमी पार्टीने नंदुरबार जिल्ह्यात ‘गाव तिथे झाडूसेना’ अभियान हाती घेतली आहे आणि त्याबरोबरच आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण आणखी ढवळून निघणार हे स्पष्ट दिसत आहे.

संविधान बचाओ मोर्चाचे आयोजन करणे, समान नागरी कायद्याला विरोध करणाऱे आंदोलन चालवणे, गावागावात झाडूसेना स्थापन करणे, त्या माध्यमातून संघटन मोहीम राबवणे असा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवी गावित यांनी दिली.

आम आदमी पार्टीचे विभागीय पदाधिकारी नाविंदर अहलुवालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवी गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवी गावित यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी आता नंदुरबार जिल्ह्यात गाव तिथे झाडूसेना हे अभियान घेऊन दमदारपणे उतरणार असून विद्यमान स्थितीत चाललेला राजकीय अनाचार, माजलेला भ्रष्टाचार याच्या विरोधात लढणार आहे. त्यासाठी गावागावात आम आदमी पार्टी लोकांचे संघटन उभे करणार आहे. त्याचबरोबर आगामी ग्रामपंचायत नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व निवडणुकांना सुद्धा प्रत्येक ठिकाणी उमेदवार देऊन आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. तुम मुझे सेना दो हम तुम्हे आजादी देंगे, हे घोषवाक्य घेऊन संविधान बचाओ ची मागणी करणाऱ्या जनमोर्चाची तयारी करायला लागा, असेही याप्रसंगी रवी गावित यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी, संघटन प्रमुख मंगेश येवले यांनी संविधान बचाव रॅली यशस्वी करण्यासाठी तसेच समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, याप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये अल्ताफ मंसूरी, कांतीलाल पावरा, चंद्रकला पाडवी, प्रीती महेश वाळवी, बिंदास गावित, मनीषा वळवी, तुलसीदास गावित, अंकित वळवी आणि इतर तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

 

 

The post नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार 'झाडूसेना' appeared first on पुढारी.