नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून धावताना पोलीस वाहन अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. हे वाहन बाजूच्या शेतात जाऊन पडले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी प्रसंगावधान राखत स्वतःसह सोबतच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठकीसाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत दोन्ही कर्मचाऱ्यांसह बुधवारी (दि. १२ जुलै) नंदुरबारकडे येत होते. नंदुरबार निजर रस्त्यावरील गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ त्यांचे वाहनाचा अपघात झाला. भरधाव वेगातील पोलीस वाहन पलटी खाऊन शेतात अडकले या अपघातात पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना मुक्का मार लागला. अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे व चालक राजू मोरे या दोघेही पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अशा परिस्थितीतही स्वतः गाडीतील दोघेही कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांना कुकरमुंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

The post नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात appeared first on पुढारी.