नाशिक : महिलेला 5 लाखांचा गंडा घालणारा गजाआड

अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर प्राॅडक्टची जाहिरात करून व्यवसायवृद्धी करून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने शहरातील महिला व्यावसायिकाला पाच लाख रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तपास करून उत्तर प्रदेशमधून एका संशयिताला अटक केली आहे. या संशयित भामट्याने सप्टेंबर २०२२ मध्ये सविता अविनाश पवार (रा. नाशिक) यांना ५ लाख १३ हजार २०० रुपयांना गंडा घातला होता.

सविता पवार यांचा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी फेसबुकवरील व्यापार इंन्फोइंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फेसबूक पेजवर लाइक केले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून भामट्यांनी संपर्क साधून व्यवसायवृद्धी करून देतो, ग्राहक वर्ग तयार करून देऊ, असे आमिष दाखवून सविता यांच्याकडे नोंदणीसाठी २६ हजार रुपयांची मागणी केली. सविता यांनी नकार दिल्याने १ हजार रुपयांत नोंदणी केली. त्यानंतर संशयितांनी संकेतस्थळ तयार करण्यासाठी, सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी, मोठे खरेदीदार तुमचे प्रॉडक्ट खरेदी करण्यास तयार असून त्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवेचे लिमिट वाढवावे लागेल अशी कारणे देत सविता यांच्याकडून ५ लाख १३ हजार २०० रुपये घेतले होते. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक सूरज बिजली, उपनिरीक्षक संदीप बाेराडे यांनी तपासास सुरुवात करून संशयितांची माहिती गोळा केली. ज्या बँक खात्यात सविता यांनी पैसे भरले होते ते खाते व मोबाइल क्रमांक उत्तर प्रदेश राज्यातील गाजियाबादमधील नितीन रमेश कुमार, राज सोमवीर राघव यांचा असल्याचे समजले. त्यानुसार सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशला जाऊन गाजियाबाद येथून नितीन कुमारला पकडले. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करून ट्राझिंट रिमांड घेऊन नाशिकला आणले. नाशिकच्या न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयितांनी इतर नागरिकांनाही अशा प्रकारे गंडा घातल्याचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत.

सोशल मीडियावरील जाहिरातींना बळी पडू नका. ऑनलाइन व्यवहार करताना खात्री करून घ्यावी, कोणतेही अनोळखी ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू नये. बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. फसवणूक झाल्यास १९३० क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेला 5 लाखांचा गंडा घालणारा गजाआड appeared first on पुढारी.