नंदुरबार : बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद – विजयकुमार गावित

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्यातील गाव, पाडे, वस्ती बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी येत्या काळात 1 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते आज अक्राणी तालुक्यातील आचपा,उमराणी ब्रु, भोगवाडे ब्रु, धनाजे ब्रु, बोरवण गावांत संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य निलिमा पावरा, सरपंच रंजनीबाई पावरा (आचपा ) ,आशाबाई पावरा (उमराणी बु. ),उपसरपंच पुष्पा पावरा (आचपा ),अनिता पावरा (उमराणी बु.), सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आला असून प्रत्येक गाव,वाडे, पाडे, वस्तीच्या ठिकाणी बारमाही जोडण्यासाठी 1 हजार 300 कोटींची योजना तयार करण्यात आली असून या रस्त्यांमुळे नागरिकांना कुठल्याही पाड्या व वस्त्यांमध्ये जाणे सोईचे होणार आहे. येत्या जुलै महिन्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या नागरिकांकडे घरे नाहीत आणि ‘ड’ यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना अर्ज केल्यावर सहा महिन्यांत घरे देण्यात येईल. घरकुल योजनेंतर्गत एका कुटुंबाला एकच घर मिळत असल्याने विभक्त कुटुंबाने आपले विभक्त कुटुंब म्हणून नोंदणी करावी.

पुढे बोलताना डॉ. गावित म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण विभागातर्फे बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी अर्थसहाय्य,बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती, प्रधान मंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामागाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींचा विवाहाकरीता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कामगारांच्या विविध योजनेंचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करणे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार या कार्यक्रमांस उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

The post नंदुरबार : बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद - विजयकुमार गावित appeared first on पुढारी.