नंदुरबार : रेल्वे प्रवासातच हार्ट ॲटॅक; प्रसंगावधान होत रेल्वे पोलिसांमुळे वाचला जीव

रेल्वे पोलीस www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

धावत्या रेल्वेत हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाला नंदुरबार पोलिसांनी जीवदान दिल्याची घटना येथील रेल्वेस्थानकावर घडली.

वारंगळ (तेलंगणा) येथील श्रीनिवास नरसय्या कस्तुरी (४८) असे प्रवाशाचे नाव आहे. ते नवजीवन एक्स्प्रेसने सुरत शहराकडे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यानच दोंडाईचा स्थानक सुटल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. ही माहिती त्यांची पत्नी तेजस्वी कस्तुरी व मुलगी लक्ष्मी कस्तुरी यांनी गाडीतील टीटीईला दिली. त्यांनी तातडीने नंदुरबार रेल्वेस्थानकात प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळवल्यानंतर दुपारी १२:२५ दरम्यान रेल्वेगाडी नंदुरबार स्थानकात आल्यानंतर श्रीनिवास कस्तुरी यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे पोलिस निरीक्षक त्र्यंबक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश गोसावी, रवि पाटील तसेच पोलिस नाईक विशाल कतीलकर हे तिघेही नंदुरबार रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवर पोहोचले. याठिकाणी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात माहिती देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात औषधोपचार मिळाल्याने श्रीनिवास कस्तुरी यांचा जीव वाचला. यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी पोलिस निरीक्षक कळमकर व पोलिसांचे आभार मानले.

हेही वाचा:

The post नंदुरबार : रेल्वे प्रवासातच हार्ट ॲटॅक; प्रसंगावधान होत रेल्वे पोलिसांमुळे वाचला जीव appeared first on पुढारी.