नंदुरबार : ॲन्टी करप्शन ब्युरोची कामगिरी: ७ महिन्यात सलग 3 दोषसिद्धी, ४ जणांना कारावास

न्यायालय www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

ॲन्टी करप्शन ब्युरोकडील दाखल गुन्हयात मागील सात महिन्यांत सलग तीन दोषसिदी झाली असून आतापर्यंत एकूण 4 आरोपीना सक्षम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. कंटेनर ट्रक गव्हाळी सीमा तपासणी पोस्टमार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी 4 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक म्हणजे आरटीओ विभागातील निरीक्षकांस व सहाय्यक रोखपाल यांना पाच हजार रुपयांच्या दंडासहित दोन वर्ष कैदेची शिक्षा शहादा न्यायालयाने नुकतीच सुनावली आहे.

कोणताही सरकारी नोकर, निमशासकीय नोकर किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी एजंट जो सरकारी काम करुन देण्याच्या मोबदल्यात लाच अथवा बक्षिसाची मागणी करतो, अशा सरकारी नोकराची किंवा त्यांच्या वतीने काम करून देतो सांगणाऱ्या खाजगी इसमाची ॲन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यास ॲन्टी करप्शन ब्युरोमार्फत लाचेचा सापळा रचत कार्यवाही करुन त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयातील नमूद तरतुदीन्वये गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर संबधित आरोपी लोकसेवक अथवा खाजगी इसमांविरुद् न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला चालविला जातो. तसेच संबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला सुरु असतांना सरकारी वकिलांमार्फत युक्तीवाद होवून आरोपींविराेधात दोषसिध्दी होण्यासाठी प्रयत्न केला जातो, तसेच पैरवी अधिकारी / अंमलदार यांच्यामार्फत देखील नमुद गुन्हयांत दोषसिध्दी होण्यासाठी पाठपुरावा केला जातो.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून ॲन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार युनिटकडील खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील स्वर्णसिंग गिरासे यांनी कौशल्यपूर्वक दोषसिध्दी होण्याच्या दृष्टीने सरकारी पक्षाची बाजू मांडून अतिरीक्त सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय, शहादा येथील जिल्हा न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्या न्यायालयाने साक्षी व पुराव्यांच्या आधारे नोव्हेंबर- 2022 या महिन्यात 1 तसेच जानेवारी 2023 या महिन्यात 1 जुन- 2023 या महिन्यात 1 अशा एकूण 3 खटल्यांत लाचेच्या गुन्हयात व दोषसिध्दी देण्यात आली आहे. तसेच एकूण 4 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्या आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणता अधिकारी अथवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर ॲन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार येथील पोलीस उप अधिक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्र. ( 02564) 230009 व टोल फी क्र. 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन राकेश चौधरी, पोलीस उपअधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.

The post नंदुरबार : ॲन्टी करप्शन ब्युरोची कामगिरी: ७ महिन्यात सलग 3 दोषसिद्धी, ४ जणांना कारावास appeared first on पुढारी.