दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

गुंतवणुकीच्या विश्वात www.pudhari.news

नाशिक :  राजू पाटील

भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल.

गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची सर्वाधिक झळ सोसावी लागली. कोरोना काळात किंमतवाढ रोखून ठेवलेल्या कंपन्यांनी मागील वर्षी दुचाकीच्या किमतीत केलेल्या वाढीने मागणीला जबरदस्त फटका बसून, दुचाकीच्या विक्रीत जवळपास १५ ते १८ टक्क्यांनी घट झाली. गेल्या पाच वर्षांपासून हे क्षेत्र मंदीने काळवंडलेले आहे. परंतु आता हे चिंतेचे दिवस दूर होण्याचे संकेत दिसत आहेत.

कोरोनाचे संकट बऱ्यापैकी ओसरल्याने आणि केंद्र सरकारने गत दोन अर्थसंकल्पांत ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याने ग्रामीण अथव्यवस्थेला गती मिळाली आहे. उत्तर भारतात यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पिकांच्या सिंचनासाठी लहान-मोठ्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा अजूनही आहे. त्यातच गत आठवड्यात काही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केंद्राने केलेली वाढ, यामुळे आगामी सहा महिन्यांत ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेकडे खर्च करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील रोखतेमुळे दुचाकी वाहनांच्या मागणीत वाढ होणार आहे. कारण वाहन उद्योगातील सुमारे ५५ टक्के मागणी ही ग्रामीण भारतातील आहे. त्यामु‌ळे इंडियापेक्षा ग्रामीण भारत दुचाकी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे.

सणांच्या काळात मागणी वाढणार

नुकत्याच पार पडलेल्या विवाहाच्या हंगामात दुचाकींना चांगली मागणी राहिल्याने आगामी तीन महिने सणासुदीच्या काळात दुचाकींच्या मागणीतील वाढीचे प्रमाण 20 टक्क्यांच्या आसपास राहील, असे अंदाज अनेक ब्रोकिंग फर्मने गत आठवड्यापासून व्यक्त केले आहेत. दुचाकी कंपन्यांचे समभाग कधी वर, कधी खाली अशा स्वरूपातच गत सहा महिन्यांत एकाच पातळीत फिरत राहिले. बजाज ऑटोने गेल्या आठवड्यामध्ये व्यवसायात वाढ सुरू झाल्याची टिप्पणी जाहीर केल्याने जुलैपासून दुचाकी कंपन्यांचे समभाग पुन्हा प्रकाशझोतात येणार, हे आता जगजाहीर आहे. तसेही दुचाकी कंपन्यांचे समभाग जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत विशिष्ट चार्टपॅटर्न तयार करत जातात. गेल्या सात-आठ वर्षांतील त्यांच्या वाटचालीचा अभ्यास केल्यास ही बाब ठळकपणे लक्षात येते.

एप्रिल-मेमध्ये विक्रीत झेप

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत दुचाकीच्या विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीआयएमने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार या दोन महिन्यांत २८ लाख दुचाकींची विक्री झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एक कोटी 80 लाख दुचाकींची विक्री होण्याचा अंदाज आहे. २०२३ च्या तुलनेत त्यात सुमारे १४ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे टीव्हीएस सुझुकी, बजाज, हिरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्स या कंपन्यांचे समभाग पुन्हा रडारवर आले आहेत.

कर्जमुक्त कंपन्या

दुचाकी कंपन्यांचे समभाग उसळण्याच्या शक्यतांव्यतिरिक्त या कंपन्यांबाबत खास बाब म्हणजे त्यांच्यावर असलेला कर्जाचा अतिशय नगण्य बोजा किंवा त्यांचे डेटफ्री स्वरूप हे होय. त्यांचा व्यवसाय मुळात अत्यंत रोख स्वरूपातील असल्याने या कंपन्या त्यांच्यावरील कर्जाचा बोजा अतिशय कमी राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. हिरो आणि आयशरवरील कर्ज अतिशय नगण्य आहे, तर बजाज कर्जमुक्त आहे. टीव्हीएस सुझुकीवरही फारसे कर्ज नाही.

आरओई (समभागावरील मिळकत) आणि आरओसीई (भांडवली खर्चावरील मिळकत) यावर नजर टाकल्यास, या कंपन्यांनी दिलेला परतावा अभूतपूर्व आहे. तो १५ ते २० टक्के या आदर्श श्रेणीत आहेत. आरओसीईतही हेच प्रमाण या कंपन्यांचे आहे, कारण या कंपन्यांवर अक्षरशः कोणतेही कर्ज नाही. टीव्हीएस मोटर्सने या दोन्ही पातळीवर अजूनही दमदार कामगिरी केली आहे. दुचाकी वाहन कंपन्यांचे सर्व समभाग १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा इक्विटीवर देतात. त्यामुळे पोर्टफोलिओच्या उभारणीत या कंपन्यांची खरेदी करण्याचे सूतोवाच अनेक म्युच्युअल फंडांनी केले आहे. ऑक्टोबरअखेर संपणाऱ्या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी कंपन्यांसाठी महत्त्वाची असते. यंदा ऑक्टोबरच्या परीक्षेत या कंपन्या केवळ उत्तीर्णच नव्हे, तर डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण होतील, अशी अटकळ आहे.

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.