नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरण(छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र, धरण परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण ६९ टक्के भरले असून, शुक्रवारी (दि.२८) प्रतिसेकंत ५३९ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण परिसरात आणखी दमदार पाऊस झाल्यास विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पुराने हाहाकार निर्माण केला असून, मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केले जात आहे. मात्र, यास नाशिक जिल्हा अपवाद आहे. जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. वास्तविक, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असतो. यंदा मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने धरणे म्हणावे त्या प्रमाणात भरलेले नाहीत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने, धरणे काही प्रमाणात भरली आहेत. गंगापूर धरण ६९ टक्के भरल्याने, शुक्रवारी (दि.२८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ५३९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

गंगापूर धरणासह पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु गंगापूरसह (६९ टक्के) भावली धरण १०० टक्के भरले असून, त्यातून ७०१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दारणा धरण ७८ टक्के भरले असल्याने त्यातून सहा हजार ५६९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या या धरणामधून तीन हजार ९५५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पापैकी १३ धरणे ५० टक्क्यांच्या खाली आहेत.

जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा

एकीकडे राज्यभर पावसाने थैमान मांडले असताना नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपा असल्याचे चित्र आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरागाणा, पेठ या तालुक्यात सुरू असलेल्या रिपरिपमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असले तरी, उर्वरीत तालुक्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सध्या या तालुक्यांमध्ये भात लावणीची लगबग सुरू आहे. मात्र, इतर तालुक्यातील पिक लागवडीने अजून म्हणावा तसा जोर धरला नाही.

दारणामधील विसर्ग वाढवला

शुक्रवारी (दि.२८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १० हजार ५१४ क्यसेकने पाण्याचे विसर्ग सुरू केला. मात्र, या परिसरात दमदार पाऊस होत असल्याने दुपारी १२ वाजेनंतर एक हजार ३८ क्युसेकने विसर्ग वाढवून आता धरणातून ११ हजार ५५२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच नांदुर मध्यमेश्वरमधून ७ हजार ९२४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.