नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी

नाफेड कांदा खरेदी,www.pudhari.news

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाल कांदा नाफेडने मार्च २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. या खरेदी केलेल्या कांद्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्यांना अदा केलेले नाहीत. तोंडावर खरीप हंगाम आल्याने नाफेडने त्वरित कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल व नाफेडचे एएमडी सुनीलकुमार सिंह यांच्याकडे केली आहे.

कांदा पिकाचे उत्पादन वाढल्याने बाजार भावात घसरण झाली होती. यामुळे विविध राजकीय पक्ष, शेतकरी यांनी रस्त्यावर उतरून कांद्याची शासकीय खरेदी करण्यास केंद्र व राज्य सरकारला भाग पाडले होते. यामुळे जानेवारी, फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्र सरकारने लाल कांदा नाफेडने शेतकरी कंपन्याद्वारे खरेदी केला आहे. बाजार समित्त्यांच्या तुलनेत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा विक्रीस पसंदी दिली होती. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापही चांदवड तालुक्यातील जवळपास २०० शेतकऱ्यांना अडीच कोटी रुपये मिळालेले नाहीत. विक्री केलेल्या लाल कांद्याचे पैसे मिळावे, यासाठी तालुक्यातील शेतकरी सबंधित शेतकरी कंपन्यांकडे चकरा मारत आहेत. मात्र कंपन्यांना नाफेडकडून पैसे न मिळाल्याने संबधित कंपन्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास अडचण येत आहे.

खरीप हंगामासाठी बी बियाणे, रासायनिक खते खरेदी करायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा या चिंतेत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडने शेतकरी कंपन्यांद्वारे खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी सभापती संजय जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा 

The post नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी appeared first on पुढारी.