नाशिककरांना ‘ती’ नकोशीच; हजार मुलांमागे 39 मुलींची घट

नाशिक : वैभव कातकाडे

केंद्र शासनातर्फे मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सातत्याने केले जात आहे, तरीदेखील नाशिक जिल्ह्यात या प्रयत्नांना यश येत नसल्याचे धक्कादायक वास्तव्य आहे. २०१८ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी ९७० असलेले लिंग गुणोत्तर यंदा ९३१ वर येऊन ठेपले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ३९ ने घट झाली आहे. ही घट चिंताजनक असून, नाशिककरांना ‘ती’ नकोशीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. मात्र, या योजना जनतेपर्यंत पोहोचतात किंवा जनतेची मानसिकताच बदलत नाही, या मागची कारणे समोर येणे आवश्यक झाले आहे. नाशिक जिल्हा हा सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात प्रभावी आणि जबाबदारीने कार्यरत असलेला जिल्हा आहे. स्त्रीजन्माची जपणूक व तिच्या हक्क-अधिकारांसाठी सातत्याने कार्य होणे अपेक्षित असतानाच गेल्या पाच वर्षांची आकडेवारी नाशिकसाठी अतिशय काळजी करण्यासारखी आहे. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायदा सक्षमपणे राबवणे अपेक्षित आहे.

यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील अवघ्या दोन तालुक्यांमध्ये लिंग गुणोत्तर सकारात्मक आहे. यामध्ये पेठ (११३१) आणि देवळा (१००८) या तालुक्यांचा समावेश आहे. तर येवला, बागलाण, दिंडोरी आणि निफाड या चार सधन तालुक्यांमध्ये आठशेच्या आत लिंग गुणोत्तर आहे. वास्तविक बघता दिंडोरी, निफाड, येवला आणि बागलाण हे सधन तालुके समजले जातात, मात्र अजूनही या तालुक्यातील नागरिकांची मानसिकता पुढारली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी अद्यापही सोनोग्राफी सेंटरमध्ये चुकीचे कामे होत असल्याचा संशय यानिमित्ताने समोर येत आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली दरमहा बैठक होते. त्यामध्ये या बाबतचा आढावा घेण्यात येत असतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुलींच्या जन्माचे स्वागत, महिला दिनानिमित्त जिल्हाभरात आठ दिवस रॅली अशा जनजागृतीपर विविध उपाययोजना करण्यात येत असतात. मात्र, तरीदेखील नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नाही.

गेल्या पाच वर्षांचे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर

2018 : 970

2019 : 969

2020 : 963

2021 : 959

2022 : 945

2023 : 931

तालुकानिहाय 2023

बागलाण : ८९९

चांदवड : ९६९

देवळा : १००८

दिंडोरी : ८८९

इगतपुरी : ९४६

कळवण : ९३२

मालेगाव : ९३४

नांदगाव : ९३०

नाशिक : ९३४

निफाड : ८७९

पेठ : ११३१

सिन्नर : ९२९

सुरगाणा : ९२०

त्र्यंबक : ९८२

येवला : ८९९

एकूण : ९३१

जिल्हा प्रशासनातर्फे नियमित तपासणी, दौरे, आढावा, जनजागृती होत असते. शासनाच्या विविध योजना त्यांची अंमलबजावणीदेखील होत आहे. मात्र, नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. जर कोणा महिलेला मुलगा व्हावा म्हणून नातेवाइकांच्या वतीने दबाव केला जात असेल तर कायद्याने त्या नातेवाइकांना शिक्षा होऊ शकते.

– डॉ अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिककरांना 'ती' नकोशीच; हजार मुलांमागे 39 मुलींची घट appeared first on पुढारी.