नाशिककर स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा क्रमांक कोणता… बघा

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशात पहिल्या पाच स्वच्छ शहरांमध्ये नाशिक शहराचा समावेश होण्याचे नाशिककरांचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची क्रमवारी सलग तिसऱ्या वर्षी घसरली आहे. गेल्या वर्षी १७ व्या स्थानी असलेले नाशिक शहर यावेळी थेट २० व्या क्रमांकावर घसरले आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सहाव्यांदा पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यात नवी मुंबईने सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला असून, राज्यात चौथ्या स्थानावर असलेले नाशिक पाचव्या स्थानावर फेकले गेले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या निकालाची शनिवारी (दि.१) नवी दिल्ली येथे घोषणा केली. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचे सहावे वर्षे होते. २०१६ मध्ये पहिल्या सर्वेक्षणात देशातील ७३ शहरांमध्ये नाशिक ३७ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये ४३४ शहरांच्या स्पर्धेत नाशिकचा क्रमांक १५१ व्या स्थानी होता. २०१८ मध्ये ४२०३ शहरांच्या स्पर्धेत ६३ व्या स्थानी, २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत ४२३७ शहरांमधून नाशिक ६७ व्या, तर २०२० मध्ये झालेल्या ४२४२ शहरांतून नाशिक शहराने देशात ११ व्या स्थानी मजल मारली होती. मागील वर्षी २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत नाशिक १७ व्या स्थानी गेले होते. यानंतर २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणाकरता नाशिक महापालिकेने जय्यत तयारी केली होती. मात्र, पुन्हा निराशा पदरी पडली आहे. नागरिकांचा प्रतिसाद अर्थात सिटिझन फिडबॅकमध्ये नाशिक या आधीच्या स्पर्धांमध्ये कमी पडत होते. यामुळे यंदा एक लाख लोकांचे फिडबॅक नोंदविण्याची मोहीम मनपाने हाती घेतली होती. एक लाखाच्या तुलनेत ४० हजार नागरिकांनी फिडबॅक नोंदविला होता. सिटिझन फिडबॅक मिळविण्यासाठी हा प्रयत्न यशस्वी ठरल्याने या घटकामुळे महापालिकेला १८०० पैकी १७३३.२४ गुण मिळाले. परंतु, सर्टिफिकेशन ऑफ वॉटर प्लस श्रेणीत महापालिकेची घसरण झाली. या श्रेणीत १८०० पैकी १००० गुण मनपाला मिळाले आहेत.

नाशिक मनपाला स्पर्धेत मिळालेले गुण असे…

– सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस – २४०० पैकी २२५८.६२

– सर्टिफिकेशन ऑफ वॉटर प्लस- १८०० पैकी १०००

– सिटिझन फिडबॅक – १८०० पैकी १७३३.२४

– एकूण गुण – ६००० पैकी ४९९१.८६

हेही वाचा:

The post नाशिककर स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा क्रमांक कोणता... बघा appeared first on पुढारी.