नाशिकमध्ये आता ‘फायर रोबोट’ मिळवणार आगीवर नियंत्रण

फायर रोबोट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गगनचुंबी इमारतींवरील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या फिनलॅण्डच्या ९० मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीचा वाद अद्याप कायम असताना, आता शहर व परिसरातील आग विझविण्यासाठी फ्रान्सच्या कंपनीकडून रिमोटवर चालणारे फायर रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (दि. २७) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात सादर करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपआयुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांच्या उपस्थितीत शार्क रोबोटिक्स या कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हा रोबोट हा बॅटरीवर चालणारा आहे. एकदा चार्ज केल्यावर तब्बल १२ तास हे यंत्र चालविता येणार असून, एक बॅटरी स्टॅण्डबाय ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या यंत्राद्वारे सलग २४ तास आग विझविण्याचे काम करता येणार आहे. बॅटरी चार्जिंगसाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागणार आहे.

या रोबोटची चेसीज उच्च प्रतीच्या धातूपासून तयार केलेली असल्याने ती ८०० डिग्री सेल्सिअसपर्यंचे तापमान सहन करू शकते. रोबोटवरचा वॉटर मॉनिटर सुमारे ६० मीटरपर्यंत थ्रो देणार आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी मुख्यालयाच्या आवारात घेण्यात आली. हा फायर रोबोट इमारतीचा जीनादेखील चढू शकतो. त्याचीही प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. रोबोटिक यंत्राचे ब्रेक हे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे आहेत. प्रकाश योजनेसाठी एलईडीचीदेखील सुविधा आहे. थर्मल इमेजिंग कॅमेरा असून रिमोटद्वारे 500 मीटर अंतरापर्यंत हे मानवरहित यंत्र कामगिरी करू शकते.

मनुष्यहानी टळणार

औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्या तसेच तळघरांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना, गॅसगळतीमुळे लागणाऱ्या आगी, इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे फायर रोबोट उपयुक्त ठरणार आहेत. या सारख्या आगींच्या घटनांमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांना उद‌्भवणारा धोका फायर रोबोटमुळे टाळता येऊ शकतो, असे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.

मोठ्या आगीच्या घटना तसेच धोकादायक क्षेत्रामध्ये जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी हा फायर रोबोट उपयुक्त ठरू शकतो. आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना उद‌्भवणारा धोकादेखील या रोबोटमुळे टाळता येऊ शकतो.

– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.

हेही वाचा

 

The post नाशिकमध्ये आता 'फायर रोबोट' मिळवणार आगीवर नियंत्रण appeared first on पुढारी.