नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम

नाशिक खाजगी बस तपासणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासगी बसच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा होरपळून झालेल्या मृत्यूच्या घटनांमुळे सतर्क झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बस तपासणीस सुरुवात केली आहे. त्यानुसार नियमांची पूर्तता व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात खासगी बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आग लागल्यानंतर प्रवाशांना बचावासाठी बसच्या खिडक्या फोडून बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांनी वर्तवला आहे. त्याचप्रमाणे शहरातील हॉटेल मिर्चीजवळ झालेल्या अपघातातही प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघातांची दखल घेत प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार खासगी बसचालक-मालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून, नियमांची पूर्तता करून अपघातमुक्त प्रवासी वाहतुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या सूचना अशा

– बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत ठेवावा. त्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये. आपत्कालीन दरवाजाच्या दर्शनी भागात हातोडा (आवश्यकता भासल्यास काच फोडण्यासाठी) ठेवणे आवश्यक आहे.

– आपत्कालीनप्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग तसेच बसमधील अन्य बचावात्मक उपकरणांसंबंधीची माहिती प्रवास सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांना द्यावी. याबाबतची चित्रफीत बसमध्ये दाखवावी किंवा ई-मेल व व्हाॅट्सॲपद्वारे प्रवाशांना द्यावी.

– वाहनचालक हा मद्यसेवन करून वाहन चालविणार नाही, याची खातरजमा वाहनमालकांनी करावी. मद्यपी चालक आढळल्यास त्याची जबाबदारी वाहन मालकाची राहील. तसेच मद्यपी चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

– वाहन चालविताना चालकाने मोबाइलचा वापर करू नये. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाईसह वाहनाचा परवाना व वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यात येईल.

– वाहनचालकांनी नियमित नेत्र व आरोग्य तपासणी करून घ्यावी. दर दोन तासांनी विश्रांती घेण्याबाबतच्या सूचना वाहनचालकांना द्याव्यात.

– वाहन चालविताना वेगमर्यादेचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने वाहनांना योग्य ते गती नियंत्रक बसविणे, वाहनात बसविलेले स्पीड गव्हर्नर उपकरण सुस्थितीत व कार्यान्वित ठेवणे व वेळोवेळी त्याचे कॅलिब्रेशन करून घेण्याची जबाबदारी वाहनमालकांची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

– बसमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी. बसमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करू नये. वाहन चालविताना लेनची शिस्त पाळणे व दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, याबाबत वाहनचालकांना निर्देश द्यावेत.

– वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण करून घ्यावे तसेच वाहन निरंतरपणे सुस्थितील राहील, याची वाहनचालक व मालकांनी दक्षात घ्यावी.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम appeared first on पुढारी.