नाशिकमध्ये डोळ्यांच्या साथीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत उद्याने बंद

नाशिकमधील उद्याने बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून. तो रोखण्यासाठी शहरातील सर्व उद्याने ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या महिनाभरापासून शहरात डोळ्यांची साथ सुरू आहे. सुरुवातीला लहान मुलांमध्ये या साथीचा संसर्ग दिसून आला होता. त्यानंतर मात्र प्रौढांमध्येही लागण वाढत गेली. गेल्या महिनाभरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तब्बल ५५०० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. गुरुवारी (दि.१७) दिवसभरात २५५ नव्या रुग्णांची यात भर पडली. डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्यांचा हा आकडा केवळ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा कितीतरी पटीने अधिक आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील उद्याने येत्या १८ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. डोळ्यांच्या साथीचा संसर्ग रोखण्यासाठी उद्याने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्यान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये डोळ्यांच्या साथीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत उद्याने बंद appeared first on पुढारी.