नाशिकमध्ये १२० किमीच्या रस्त्यांवर ‘व्हाइट टॅपिग’करणार

व्हाइट टॅपिग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून देखील काही महिन्यातच रस्ते खड्ड्यांमध्ये हरवत असल्याने, नाशिक महापालिकेकडून ‘व्हाइट टॅपिंग’ या तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे काॅक्रीटीकरण केले जाणार आहे. शहरातील तब्बल १२० किलोमीटरच्या रस्त्यांवर हे तंत्रज्ञान वापरले जाणार असून, या नवीन तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे आयुर्मान तब्बल वीस वर्षांनी वाढणार आहे. शिवाय कोट्यावधींची बचतही होणार असल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे.

महापालिका बांधकाम विभाग शहराचा वाढत‍ा विस्तार पाहता दरवर्षी शंभर ते दोनशे किलोमीटरचे रस्ते बांधत असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. शिवाय अनेक रस्ते दहा ते बारावर्षापुर्वी तयार केले असून त्याची डागडुजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. पावसाळ्यात तर शहरच खड्डयात जाते. त्यामुळे खड्डे बुजविण्यावर कोट्यवधीचा पैसा पाण्यात जातो. सध्या मागील सिंहस्थात बांधलेल्या रिंगरोड व इतर रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. त्याच्या डागडुजीसाठी किमान सहाशे कोटींची आवश्यकता आहे. पण मनपाच्या तिजोरीत खडखडाट असून रस्ते दुरस्तीला निधीची चणचण आहे. ही परिस्थिती पाहता बांधकाम विभागाने शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या प्रक्रियेतरस्त्याचे भूपृष्ठ १०० ते १५० मिमी खरवडून काढल्यानंतर ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॅपिंग’मध्ये एम-६० हे काँक्रिट टाकले जाते.त्यानंतर सहा दिवस पाण्याचा मारा देऊन हा थर सुकवला जातो. जेणेकरुन रस्त्याच्या पृष्ठभागावर हा थर घट्ट बसेल. देशातील विविध शहरात रस्ते दुरुस्ती व डागडुजीसाठी या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे पारंपारिक पध्दतीत डांबराणे रस्त्याचे अस्तरीकरण करणे व त्यासाठी येणार्‍या खर्चाची बचत होईल. साधारणत: या नवीन तंत्रज्ञानामुळे खड्डे बुजविण्यावर दरवर्षी होणार्‍या कोट्यवधीच्या पैशाची बचत शक्य आहे.

या शहरात तंत्रज्ञानाचा वापर

देशातील ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, गाजियाबाद, जयपूर, हैदराबाद महापालिकांमध्ये व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञान रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी वापरले जाते.

महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी व्हाइट टॅपिंग या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. मुंबई – गोवा महामार्गावर या नवीन तंत्रज्ञानाने दुरुस्ती करण्यात आली.शहरातील १२० किमीचे रस्ते या तंत्रज्ञानाने दुरुस्त केले जातील.

– शिवकुमार वंझारी, शहर अभियंता, मनपा

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये १२० किमीच्या रस्त्यांवर 'व्हाइट टॅपिग'करणार appeared first on पुढारी.