नाशिकरोड येथे लवकरच नोट प्रेस संग्रहालय

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथे लवकरच नोट प्रेस संग्रहालय होणार आहे. नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पात्रा घोष यांच्या हस्ते या संग्रहालयाचे आज सोमवार (दि.२४) भूमीपूजन झाले. नाशिकरोड करन्सी नोट प्रेस समोरच्या जागेत हे संग्राहलय उभारणार आहे.

भूमीपूजनप्रसंगी प्रेस महामंडळाचे संचालक एस. के. सिन्हा, नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, आयएसपी प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बंसल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, संतोष कटाळे, राजू जगताप, अण्णा सोनवणे, योगेश कुलवधे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रेसतर्फे नेहरूनगरच्या पूर्वेकडच्या प्रवेशव्दाराजवळ प्रेस कामगारांच्या सायकल स्टॅन्डच्या जागी नवीन ग्रंथालय प्रेसतर्फे सुरु झाले आहे. त्याची पाहणी तृप्ती घोष यांनी केली. भूमीपूजन झाल्यानंतर तृप्ती घोष म्हणाल्या की, नाशिकमध्ये प्रथमच चलनी नोटांचे प्रदर्शन झाले होते. प्रदर्शनाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिला. नाशिकरोडला कायमस्वरुपी नोट संग्रहालय व्हावी, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार करन्सी नोट संग्रहालय होत आहे. नोटांबरोबरच सिक्युरीटी प्रेसची उत्पादने व जुन्या वस्तू येथे नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. देशाच्या विकासात मोलाचे योगदान करणा-या या दोन्ही प्रेसच्या प्रगतीचे टप्पे, कार्य याची माहिती जनतेला व्हावी हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. हे संग्रहालय देशभरातील लोकांच्या कौतुकास पात्र ठरेल. हे एक चांगले पर्यटन स्थळ होईल. कार्यक्रमाप्रसंगी प्रेस महामंडळाचे संचालक एस. के. सिन्हा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रेस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेसच्या ग्रंथालयाची पाहणी केल्यानंतर तृप्ती घोष म्हणाल्या की, प्रेस कामगारांसाठी सुरु केलेल्या ग्रंथालयात जुनी व आधुनिक पुस्तके ठेवली जाणार आहेत. या ग्रंथालयाचा प्रेस कामगारांबरोबरच नाशिककरांनीही जास्तीत जास्त उपयोग करावा. ग्रंथालयातील स्पर्धा व अन्य पुस्तकांचा अभ्यास केल्यास सर्वांचीच प्रगती होईल. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. येथे काही सुविधा लागल्यास त्या देऊ. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या नोटांच्या प्रदर्शनाचे उदघाटन तृप्ती घोष यांनी केले होते. या प्रदर्शनाला पाच हजार लोकांनी भेट दिली होती. त्यावेळी नोट संग्रहालय व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्याला तृप्ती घोष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता संग्रहालयाचे भूमीपूजन होत असल्याबद्दल समाधान वाटते. शिर्डी, त्र्यंबकेश्वरमुळे नाशिकही देवभूमी झाली आहे. त्या भाविकांचा, पर्यटकांचा नोट संग्रहालयाला चांगला प्रतिसाद लाभेल. -जगदीश गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस.

हेही वाचा:

The post नाशिकरोड येथे लवकरच नोट प्रेस संग्रहालय appeared first on पुढारी.