International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना

पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

रोजच्या कामातून ब्रेक मिळावा म्हणून पिकनिक प्लॅन केल्या जातात. प्रत्येक ऋतूचे खास वैशिष्ट्य असल्याने पिकनिकची ठिकाणे ऋतुमानानुसार बदलतात. पावसाळ्यात निसर्गाचे रूप बहरलेले असते, उन्हाळ्यात गारवा मिळावा म्हणून नैसर्गिक पर्यटन, बीच, तर हिवाळ्यात इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आज आंतरराष्ट्रीय पिकनिक डे असल्याने पिकनिकला जाण्याच्या काही भन्नाट कल्पना बघू या…

पौर्णिमेच्या रात्री केलेले ट्रेकिंग : पौर्णिमेच्या रात्री मोठा चंद्र बघायला मिळतो. चंद्राच्या उजेडात मस्त ट्रेक प्लॅन करता येतो. चंद्राच्या उजेडात ट्रेकिंगला सुरुवात करायची. एकदा सुरुवात केली की, चंद्र अधिक जवळ वाटायला लागतो. एकदा वरती पोहचले की, शेकोटी पेटवून चंद्राच्या उजेडात छानपैकी गप्पांची मैफल रंगते. शिवाय चंद्राच्या उजेडात डिनर करायची मजा काही औरच असते. पौर्णिमेच्या रात्री केलेल्या ट्रेकिंगचा अनुभव विलक्षण असतो.

खेडेगावात शेतावर केलेली पिकनिक : शहरी लोकांना खेडेगावातील शेतीचे अप्रूप असते. गावात अनेक फिरणाऱ्या बैलगाड्या दिसतील पण तीच बैलगाडी शहरात आली की, शहरी लोकांना त्यात बसण्याची उत्सुकता असते. जर गावाकडची जीवनशैली समजून घ्यायची असेल, तर खेडेगावात शेतावर जाण्याची पिकनिक प्लॅन करा. शेतात पीक कसे घेतले जाते, शेतातील ताजी भाजी तोडून चुलीवर तयार केलेले गरम जेवण, पाटावरच पाणी, आमराईतील ताज्या कैऱ्या, जांभूळ, बोरे यासारखी फळे तसेच झाडाला बांधलेला झोका, गावाकडची शांतता या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल, तर शेतावर पिकनिक प्लॅन करा.

अनप्लॅन ट्रिप : वास्तविक पिकनिकला जाताना बरेच प्लॅन्स केले जातात. कुठे जायचे, कसे जायचे, कुणासोबत जायचे, कोणते सामान बरोबर घेऊन जायचे वगैरे… पण अनप्लॅन पिकनिकमध्ये कोणतेही प्लॅन केलेले नसतात. मनात आले, इच्छा झाली की, आहे त्या कपड्यानिशी वाटेल तिथे, कुणी सोबत असो, नसो, वाटेल त्या रस्त्याने निघायचे पिकनिकला. या पिकनिकचा येणारा अनुभव निराळा असतो.

सोलो ट्रिप : स्वत:ची कंपनी एन्जॉय करायची असेल, तर सोलो ट्रिप प्लॅन करून बघा. इ‌थे ना कुणाचे बंधन असते, ना कुणाची जबाबदारी. मनाजोगे कुठेही हिंडता, फिरता येते. एकटे पिकनिकला गेल्यामुळे स्वतःला ओळखण्याचा विलक्षण अनुभव येतो. शिवाय स्वतःमधील क्षमता समजते. रोजच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वावलंबी होता येते. एकटे राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चांगले वाईट अनुभव येऊन अडचणींचा एकट्याने सामना करण्याची प्रेरणा मिळते.

वीकेंड ट्रिप : मेट्रो सिटीमध्ये सततची ट्रॅफिक, माणसांची गर्दी, प्रदूषण, कामाची धावपळ त्यामुळे आठवडाभर शरीर आणि मन थकलेले असतात. शांतता, निवांतपणा अनुभवण्यासाठी शहरातील लोक वीकेंड येण्याची वाट बघतात. या ट्रिपचे आठवडाभरापूर्वी प्लॅनिंग झालेले असते. यामध्ये फॅमिली, ऑफिस, फ्रेंड सर्कल एकत्र येऊन फार्म हाउस किंवा बंगला रेंटने घेऊन पार्टी करतात. यामुळे नवीन येणाऱ्या आठवड्यात कामासाठी मन आणि शरीर फ्रेश असते. यामध्ये प्रत्येक पिकनिकचा येणारा अनुभव मजेशीर असणार आहे आणि या पिकनिकच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. त्यामुळे पिकनिक भन्नाट कल्पना प्लॅन करा आणि एन्जॉय करा.

The post International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना appeared first on पुढारी.