Nashik : देवळालीत युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणास कोठडी

पोलिस कोठडी,www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

युवतीवर सतत बलात्कार करून मारहाण आणि गर्भपात करत तिच्यासह कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुज्जफर ऊर्फ मुजीब जराक खान (२८, रा. आडकेनगर, देवळाली कॅम्प) असे संशयिताचे नाव असून, त्याच्या आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जफरचा पीडित युवतीसोबत नऊ वर्षांपासून परिचय होता. दोघांची मैत्री असल्याने मुज्जफरच्या घरी पीडितेचे येणे-जाणे होते. याच दरम्यान मुज्जफरने तिला लग्नाचे आमिष दाखवले; परंतु युवतीने लग्नास नकार दिला. मात्र, मैत्रीचा गैरफायदा घेत मुज्जफरने युवतीस वेळोवेळी घरी बोलवून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गरोदर राहिली. मुज्जफर व त्याच्या आईने मार्च महिन्यात नाशिकरोड येथील एका हॉस्पिटलमध्ये पीडितेचा गर्भपात घडवून आणला. याची वाच्यता केल्यास पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने पीडितेने देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध फिर्याद दिली.

पोलिसांनी संशयित मुज्जफरला ताब्यात घेत रविवारी (दि. ११) न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : देवळालीत युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणास कोठडी appeared first on पुढारी.