नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

पोलीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिस दलातील २७ जागा अनुकंपा तत्त्वानुसार लवकरच भरण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र, नुकतीच पोलिस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानुसार सन २०२० ते २०२२ या दोन वर्षांतील २२ पुरुष व पाच महिला अशा एकूण २७ उमेदवारांची यादी पोलिस मुख्यालयाने तयार केली आहे. त्यापैकी पात्र वारसदारांना नियुक्तिपत्रे मिळणार आहेत. नियुक्ती झाल्यास या उमेदरावांचे खाकीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पोलिस आयुक्तालयातील पोलिस पाल्य अनुकंपा भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांनी याची दखल घेत कार्यवाहीस सुरुवात केली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस शिपाई पदाच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी पोलिस उपआयुक्तांची अनुकंपा निवड समिती २०२३ तयार करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार चव्हाण हे समितीचे अध्यक्ष असून, उपआयुक्त प्रशांत बच्छाव सदस्य आणि मुख्यालय उपआयुक्त मोनिका राऊत या सदस्य सचिव आहेत. या समितीला अनुकंपा यादीनुसार पात्र-अपात्र उमेदवारांची पडताळणी करून संपूर्ण प्रक्रिया पार पाडून त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अहवाल पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रक देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणीनंतर नियुक्तिपत्रे दिल्यानंतर पात्र वारसदारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पात्र उमेदवार उच्चशिक्षित आहे. तर एक मुलगी व तीन मुलांची वयाची व शैक्षणिक अर्हतेची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांची निवड यादीत नाव समाविष्ट झाली असली, तरी अर्हता पूर्ण झाल्यावरच त्यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रक्रिया होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी appeared first on पुढारी.