नाशिक : … अन् त्यांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला कर्तव्य पथावरील सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या कर्तव्यपथावर होणारा दिमाखदार सोहळा बघणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. भारत सरकारच्या केंद्रीय जनजाती मंत्रालयतर्फे देशभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. त्यामध्ये राज्यातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली.

शुक्रवारी (दि २६) दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे परेड पाहण्याची संधी देशभरातील सर्व एकलव्य रेसिडेन्शियलच्या विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 30 विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दिल्ली मेट्रोद्वारे कर्तव्यपथ येथे ध्वजारोहण, विविध राज्यांच्या वेशभूषा घेतलेल्या झाकी, वायुदलाच्या विमानांची आतषबाजी, नौदल, भूदल यांच्या जवानांची प्रात्यक्षिके पाहण्यास मिळाली.

नाशिक
नाशिक : कर्तव्य पथावर आदीवासी शाळेतील विद्यार्थी

कर्तव्यपथ येथील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व संघर्षावर आधारित भूमिका साकारली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिल्ली येथील हुमायूनचा मकबरा, कुतुबमिनार इ. प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांसमवेत दिल्ली येथे दीपक हुकरे, विवेक पाटील, सोनिया हुगाडे, सोनल कापडणेकर उपस्थित होते. या 30 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात दि. 29 जानेवारी 2024 रोजी सहभागी होणार आहेत. दिल्ली येथील भेटीसाठी अपर आयुक्त तुषार माळी, उपायुक्त विनिता सोनवणे, सहायक प्रकल्पाधिकारी दाभाडे यांनी अथक परिश्रम घेतले तसेच शैक्षणिक सल्लागार कलाथीनाथन यांचे मार्गदर्शन लाभले.

मंत्री अर्जुन मुंडांसोबत अनुभवकथन
यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्रीय आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अर्जुन मुंडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व दिल्ली भेटीचे अनुभव कथन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : ... अन् त्यांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला कर्तव्य पथावरील सोहळा appeared first on पुढारी.