नाशिक : अपहारानंतर आली जाग; मनपाच्या संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोडपाठोपाठ पंचवटी विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टीची रक्कम जमा न करता काही कर्मचार्‍यांनी पैशांचा अपहार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मनपाच्या संगणकीय प्रणालीतील दोषांमुळेच अशा स्वरूपाचा अपहार झाल्याचे समोर आल्याने आता त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या संपूर्ण संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संगणक विभागाला दिले आहेत.

महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणार्‍या संगणकीय प्रणालीमध्येच अनेक त्रुटी असल्याने नाशिकरोड तसेच पंचवटी विभागीय कार्यालयात अपहाराचे प्रकरण घडले. त्यामुळे आताची संगणक प्रणाली बदलून नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध करांचा भरणा मनपाच्या संकेतस्थळाव्दारे तसेच एनएमसी ई- कनेक्ट अ‍ॅपद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय युनियन बँकेच्या सहकार्याने मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांसह जवळपास 30 ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातूनही नागरिकांना विविध स्वरूपाच्या परवानग्या तसेच करांचा भरणा करता येतो. नाशिकरोड विभागातील नाशिकरोड तसेच गांधीनगर कर भरणा केंद्रातील कर्मचार्‍यांनी सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार मागीलवर्षी समोर आला होता. पाठोपाठ पंचवटी विभागीय कार्यालयात अशाच स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले होते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे यांच्यामार्फत करण्यात आली. चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या. करवसुली विभागातील संगणकीय प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचे या चौकशीतून समोर आले. संगणकीय प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन अपहाराची प्रकरणे घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी महापालिकेच्या संगणकीय विभागाचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला. सध्याची संगणक प्रणाली बदलून नवीन संगणक प्रणाली विकसित केली जाणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

खासगी संस्थेकडे प्रणालीचा कारभार
मनपातील संगणक विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी महापालिकेतील स्थापत्य अभियंत्याकडे अनेक वर्षांपासून आहे. सध्या विद्युत अभियंत्याकडे या पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. आयटी विभागाला आयटी तज्ज्ञ असलेल्या अधिकार्‍याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. खासगी संस्थेच्या ताब्यात मनपाची संगणकीय यंत्रणा आहे. त्यामुळे डाटा हॅक होण्यासारखे प्रकारही या आधी घडले आहेत. असे असताना मनपाच्या संगणक प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिटच आजवर करण्यात आले नव्हते. अपहाराचे प्रकार घडल्यानंतर मनपाला ऑडिटची आठवण झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अपहारानंतर आली जाग; मनपाच्या संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट appeared first on पुढारी.