नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा

गोदावरी नदी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरी नदीसह शहरातील उपनद्यांच्या प्रदुषणमुक्तीसंदर्भात आयआयटी पवईकडून व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर झाला असून, आता महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ते ८ नैसर्गिक नाल्यांसाठी ‘ईन-सीटू’ प्रक्रिया राबविली जाणार आहे.

गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीवर उपाययोजना करण्याबाबत आयआयटी पवई या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे दोन सदस्यीय पथक गेल्या १० जानेवारीला नाशिकमध्ये आले होते. या पथकाने शहरातील मल्हारखाण, बजरंग नाला, चिखली नाला, कार्बन नाला, भारतनगर, बजरंगवाडी, फेम चित्रपटगृहामागील नाला, चोपडा नाला, सुंदरनगर, रोकडोबावाडी नाला, चेहडी यासह १९ नैसर्गिक नाल्यांची पाहणी करत त्याचा सर्वेक्षण तयार केला होता. संबंधित नाल्यांमधील सांडपाण्याचे नमुने पथकाने घेतले होते. प्राथमिक सर्वेक्षण करून पथक ११ जानेवारीला मुंबईला रवाना झाले होते. सर्वेक्षणाअंती या पथकाने पूर्व व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करत १८ जानेवारीला व्हिसीव्दारे झालेल्या आॅनलाईन बैठकीत सादर केला होता. प्राथमिक अहवालानंतर नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर आराखडा सादर करण्यास आयआयटी पवईला सूचना करण्यात आल्या आहेत.

उपनद्या तसेच नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मोहिम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून आयआयटी पवईच्या माध्यमातून शहरातील नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यासंदर्भातील आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.

– नितीन वंजारी, शहर अभियंता.

हेही वाचा : 

The post नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा appeared first on पुढारी.